लोकमत इम्पॅक्ट-विद्यार्थ्यांना मिळाले अखेर अधिकृत ओळखपत्र : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 05:34 PM2018-11-16T17:34:33+5:302018-11-16T17:34:52+5:30
विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्रच दिले जात नसल्याने विभागातील विद्यार्थी आपापसात पैसे गोळा करून ओळखपत्रे छापून घेत होती.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विविध विभागातील विद्यार्थ्यांना अखेर विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत ओळखपत्र मिळाली आहेत. अधिकृत ओळखपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर ओळखपत्र मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ओळखपत्रच दिले जात नसल्याने विभागातील विद्यार्थी आपापसांत पैसे गोळा करून ओळखपत्रे छापून घेत होती. काही ठिकाणी विभागप्रमुखांकडून पैसे गोळा करून विद्यार्थ्यांना ती दिली जात होती. विद्यापीठामध्ये ओळखपत्राबाबत होत असलेला हा निष्काळजीपणा ‘लोकमत’ने उजेडात आणून त्याबाबत पाठपुरावा केला होता. विद्यापीठ प्रशासनाने त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना विद्यापीठाकडून केंद्रीकृत पद्धतीने विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाणे अपेक्षित असताना ते उपलब्ध होत नव्हते. विद्यापीठाच्या स्थापनेला ६८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ओळखपत्र देण्याची केंद्रीकृत सुविधा नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
कुठल्याही शासकीय, खाजगी शैक्षणिक संस्था, कार्यालये व कंपन्यांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ओळखपत्र दिले जाते. ओळखीचा पुरावा म्हणून तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असते. विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये ओळखपत्र ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ओळखपत्रामध्ये संबंधित विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, रजिस्टर क्रमांक, रक्तगट, फोटो आदी महत्त्वपूर्ण माहिती असते. विद्यार्थ्यांना विविध कारणांसाठी ओळखपत्रांची गरज भासते. अगदी बसच्या पासपासून ते आरोग्य केंद्रात उपचार घेण्यापर्यंत सगळीकडे ओळखपत्राची मागणी केली जाते. त्याचबरोबर काही वेळेस सुरक्षारक्षकांकडूनही ओळखपत्र दाखविण्यास सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विभागप्रमुखांकडे सातत्याने ओळखपत्रांची मागणी केली जायची. मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याचीच व्यवस्था नसल्याने संबंधित विभागांनी त्यांच्या पातळीवर अनेक बेकायदेशीर फंडे शोधून काढले होते. विद्यापीठ प्रशासनाकडून ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अनेक अडचणींमधून सुटका झाली आहे.
................
आपापसांत पैसे गोळा करून छापून घेत होते पुढील वर्षीपासून अधिक चांगली व्यवस्था
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी त्यामध्ये आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. विभागाचे ओळखपत्र, जयकर ग्रंथालयाचे ओळखपत्रक,वसतिगृहाचे ओळखपत्र अशी वेगवेगळी ओळखपत्रे न देता एकच ओळखपत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
...............................................
अडचणींमधून सुटका
विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी ओळखपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे यापूर्वी अनेक विभागात विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्तरावर आपापसात पैसे गोळा करून ओळखपत्रे छापून घेतली होती. मात्र ती विद्यापीठाची अधिकृत ओळखपत्रे ठरू शकत नव्हती. यापार्श्वभुमीवर अखेर विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत ओळखपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांची मोठया अडचणींमधून सुटका झाली आहे.
-सतीश पवार, विद्यापीठ अध्यक्ष, एनएसयुआय