लोकमतचा दणका: दोन जण निलंबित, चौकशीचे आदेश ; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व अस्थींसाठी पैशांची मागणी प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:54 PM2020-07-23T13:54:45+5:302020-07-23T13:56:31+5:30
कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधी आणि अस्थी देण्यासाठी पैसे घेतली जात असल्याची गंभीर घटनेची दखल 'लोकमत' ने घेतली होती.
पुणे : कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यविधी आणि त्यांच्या अस्थी देण्यासाठी नातेवाईकांकडे पैशांची मागणी केल्याचे प्रकरण 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर त्याचे पडसाद पालिकेत उमटले. यासंदर्भात विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी तातडीने यासंदर्भात बैठक घेत संबंधीत ठेकेदारांना सक्त सूचना दिल्या. येरवडा स्मशानभूमीतील दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे कंदुल यांनी सांगितले.
येरवड्यातील स्मशानभूमीत कोरोना बाधित मृत व्यक्तींचे अंत्यविधी केले जातात. गॅस दाहिनीमध्ये हे अंत्यविधी होत असल्याने तसेच येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतदेहांची संख्या अधिक असल्याने नातेवाईकांना बराच वेळ थांबावे लागते. काही कर्मचारी नातेवाईकांना गाठून लवकर नंबर लावण्याकरिता तसेच अंत्यविधी झाल्यानंतर अस्थी देण्याकरिता पैशांची मागणी करतात अशा तक्रारी नातेवाईकांकडून केल्या जाऊ लागल्या आहेत. असाच विदारक अनुभव आलेल्या वडगाव शेरी येथील साबळे कुटुंबियांनी आपली कैफियत 'लोकमत'कडे मांडली होती.
या कुटुंबाकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाला 'लोकमत'ने वाचा फोडताच जाग्या झालेल्या प्रशासनाने कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतील ठेकेदारांना सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान, येरवडा स्मशानभूमीतील दोन कर्मचारी तात्काळ कामावरून कमी करण्यात आले आहेत.
-------------
वडगाव शेरी येथील साबळे कुटुंबियांना आलेला अनुभव 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध होताच दत्तवाडी दांडेकर पूल येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश भोसले यांनीही आपला अनुभव 'लोकमत'कडे कथन केला. त्यांच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठीही तेथील कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळची मानसिकता आणि परिस्थिती याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे भोसले यांनी सांगितले.
---------
शिवसेनेचे माजी गटनेते आणि नगरसेवक संजय भोसले यांनी स्मशानभूमीत जाऊन परिस्थितीची पाहणी करीत ठेकेदारासह अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. स्मशानभूमीत आलेल्या नागरिकांना नाडणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार तात्काळ थांबवून येथे काम करणाऱ्या सर्वांच्या तात्काळ अन्यत्र बदल्या करण्याची मागणी केली.
---------
घडलेला प्रकार दुर्दैवी असून यासंदर्भात ठेकेदार अधिकारी यांची तात्काळ बैठक घेऊन सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. येरवडा स्मशानभूमीतील दोन कर्मचारी तात्काळ कामावरून कमी करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तक्रारीनुसार योग्य ती चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल.
- श्रीनिवास कंदुल