लोकमत 'लोक'जीबी विशेष: योग्य सेवा मिळत नाहीत; पुणेकरांच्या प्रश्नांसाठी माजी नगरसेविका गरजल्या
By प्रमोद सरवळे | Updated: March 5, 2024 13:40 IST2024-03-05T13:38:06+5:302024-03-05T13:40:14+5:30
प्रशासक राज असल्याने माजी नगरसेवकांचा आरोप - प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला

लोकमत 'लोक'जीबी विशेष: योग्य सेवा मिळत नाहीत; पुणेकरांच्या प्रश्नांसाठी माजी नगरसेविका गरजल्या
पुणे: लोकमतने पुण्यात लोकजीबी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला नगरसेवकांनीही सभागृह गाजवले. मनीषा लडकत यांनी शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा मांडला. भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांनी शहरातील बागा आणि क्रीडांगणकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मांडला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका स्मिता कोंढरे म्हणाल्या, आंबेगाव तलाव येथील जलपर्णीवर उपाययोजना करण्याची मागणी केली. तलाव स्वच्छ करण्याचीही मागणी केली.
शहरातील कामे करताना खात्यामंध्ये समन्वय ठेवला पाहिजे. झाडांच्या छाटणी करताना काळजी घेतली पाहिजे, तसेच बागाही स्वच्छ ठेवण्याची मागणी यावेळी माजी नगरसेविका गायत्री खडके यांनी केली. तर महापालिकांच्या दवाखान्यात डॉक्टर नसल्याने पुणेकरांना योग्य सेवा मिळत नाहीत. त्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन शहरातील आरोग्य व्यवस्था सदृढ करावी अशी मागणी, माजी नगरसेविका सोनाली लांडगे यांनी केली.
माजी नगरसेविका आरती कोंढरे यांनी शासकीय ठेकेदारीवर टीका केली. राज्यातील राजकीय असवस्थेमुळे पुणे शहरात अराजकता माजली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या आरोपानंतर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. पुणे शहरातील पाण्याचा आणि ड्रेनेजची मोठी अडचण आहे. पिण्याच्या पाण्यातून दूषित पाणी येत आहे, अशा भावना अर्चना मुसळे यांनी व्यक्त केल्या. या जीबीमध्ये कात्रज परिसरातील पाण्याचा मुद्दा माजी नगरसेविका अमृता बाबर यांनी मांडला.