लोकमतच्या महामैफलीत रविवारी करा मराठीचा जागर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 10:14 PM2022-02-26T22:14:43+5:302022-02-26T22:18:00+5:30

‘लोकमत मराठी भाषा संमेलन’ कोथरुडमध्ये; महाराष्ट्राच्या मानबिंदूसोबत साजरा करू मराठी राजभाषा दिन 

lokmat organise marathi bhasha sammelan to celebrate marathi bhasha din | लोकमतच्या महामैफलीत रविवारी करा मराठीचा जागर

लोकमतच्या महामैफलीत रविवारी करा मराठीचा जागर

Next

पुणे : मराठी राजभाषा दिनानिमित्त रविवारी महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या वतीने लोकमत मराठी भाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमतच्या या महामैफलीत काव्य, नाटक, परिसंवादातून मराठीचा जागर होणार आहे.  

कोथरुडच्या बालशिक्षण सभागृहात येत्या रविवारी ही मराठमोळी मैफल  रंगणार आहे. प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले या संमेलनाचे उद्घाटक असून, प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ अध्यक्ष असणार आहेत. ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे आहेत.

दुपारी तीन वाजता प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे आणि अभिनेता शिवराज वायचळ यांचे 'लव्ह यू' हे नाटक या संमेलनाचे आकर्षण आहे. मूळचे हे जर्मन नाटक 'मॅक्समुल्लर भवन'ने खास मराठीत आणले आहे.

दुपारी चार वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. मराठी संवर्धनासाठी काम करणाऱ्या मराठीप्रेमींचा यामध्ये सन्मान केला जाणार आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता काव्यऋतू अर्थात काव्य मैफलीत कवितांची बरसात होणार आहे. ज्येष्ठांबरोबरच नव्या दमाचे तरुण कवीही यामध्ये सहभागी होणार आहेत. 'मराठी फुलवणारी तरुणाई' या परिसंवादात नव्या युगाच्या मराठीचा जागर तरुण करणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता हा परिसंवाद रंगणार आहे.

रात्री आठ वाजता ‘सोबतीचा करार‘ या सांगीतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होणार आहे. मराठी गझलचा बेभान थरार अनुभवता येणार आहे. प्रसिध्द कवी वैभव जोशी यांचे काव्यलेखन आणि सादरीकरण आहे. दत्तप्रसाद रानडे यांचे गायन आहे.

प्रथमच होणाऱ्या लोकमत मराठी भाषा संमेलनात सहभागी होण्याचे ‘लाभले आम्हास भाग्य’ अशीच पुणेकरांची भावना असेल. हा जागर मराठीची कीर्ती त्रिखंडात वृद्धिंगत करेल, यामध्ये शंका नाही. कविता, नाटक, गझलांच्या सांगीतिक मेजवानीबरोबरच मराठीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या पुणेकरांना गौरविले जाणे अभिनव आहे. लोकमत मराठी भाषा संमेलन ही पुण्याची आगळी-वेगळी ओळख बनेल.
- उषा काकडे, अध्यक्षा, ग्रॅव्हिटास फाऊंडेशन

Web Title: lokmat organise marathi bhasha sammelan to celebrate marathi bhasha din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.