लोकमत पाहणी : लोकशाही दिनी प्रमुख अधिकारीच गायब, कामास विलंब, नागरिकांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:12 IST2025-04-22T14:10:43+5:302025-04-22T14:12:02+5:30
लोकशाही दिन असताना तहसीलदार निवडणूक कामांसाठी बाहेर गेल्याने तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट होता.

लोकमत पाहणी : लोकशाही दिनी प्रमुख अधिकारीच गायब, कामास विलंब, नागरिकांना मनस्ताप
कळस : इंदापूर तालुक्यातील प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी व सहायक निबंधक कार्यालयात लोकशाही दिन असताना प्रमुख अधिकारीच गैरहजर राहिल्याने वेळेवर काम होण्यास विलंब होत आहे. त्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ५:४५ अशी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी किमान ९:१५ पर्यंत ऑफिसमध्ये येणे अपेक्षित असते. पण, अनेक कर्मचारी अपेक्षित वेळेत ऑफिसमध्ये येत नसल्याचे आढळून आले आहे. सोमवारी (दि. २१) लोकशाही दिन असताना तहसीलदार निवडणूक कामांसाठी बाहेर गेल्याने तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट होता.
तालुका कृषी अधिकारी कार्यशाळा आहे म्हणून पुणे येथे गेल्याचे सांगितले तर सहायक निबंधक अधिकारी यांनी मी रजेवर असल्याचे सांगितले. त्यामुळे लोकशाही दिन असताना प्रमुख अधिकारीच गैरहजर राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसून स्वच्छतागृहाची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याकडे डोळेझाक केली जात आहे.
शासकीय कार्यालयात कामांमध्ये अनियमितता आणि वेळेवर काम न होणे ही एक सामान्य समस्या निर्माण झाली आहे. कार्यालयांनी कामाच्या वेळांचे योग्य पालन करणे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवणे आणि कामाच्या प्रगतीचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक बनले आहे.
शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना एक ते दीड तास प्रतीक्षेतच राहावे लागत असल्याचे चित्र आहे. नागरिकांची शिधापत्रिकांची कामे लवकर होत नसल्याची तक्रार आहे. शासनाने शिधापत्रिकांबाबतची विविध कामे पब्लिक लॉगिन वरून करण्यासाठी लॉगिन अद्ययावत केले. मात्र यावरून कामेच होत नसल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. तर शासकीय कार्यालयाला दिलेले लॉगिन देखील सर्व्हरच्या तांत्रिक कारणांमुळे अडचणी येऊन कामे रखडली जात आहेत.
अधिकारी, कर्मचारी हजेरी लावून होतात गायब
काही कर्मचारी जेवणाचा डब्बा आणतात, तर काही कर्मचारी दुपारी जेवण्यासाठी घरी जातात. दुपारी बाहेर जाण्यासाठी बायोमेट्रिकची अडचण नसल्याने यथावकाश कार्यालयात येतात. काही कर्मचारी आपली बाहेरची कामे करत राहतात. याकडे तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
गेल्या दोन महिन्यांपासून सर्व्हर समस्येमुळे व कार्यालयात अधिकारी भेटत नसल्याने शिधापत्रिकांसंबंधी कोणत्याही प्रकारची कामे होत नाहीत. यासाठी वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागात कामे खोळंबली आहेत. तीन वेळा येऊनही माझे अजून रेशनकार्डचे काम प्रलंबित आहे.
- पोपट वणवे, लाकडी