लोकमत रणरागिणी : अंधारावर चालून जाणार आज रातरागिणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:13 AM2023-12-22T11:13:48+5:302023-12-22T11:14:34+5:30
उद्या नातवंडांनी विचारलं तर तुला मान खाली घालावी लागू नये म्हणून मी आजच अंधारावर चालून जाणार आहे...
पुणे : ‘‘फक्त नकार दिला म्हणून मुलींवर कोयत्याने हल्ले होत होते, अत्याचार होत होते, गर्भात मुलींना मारलं जात होतं आणि नवजात मुलींना संपवलं जात होतं तेव्हा तू काय करत होतीस? असं उद्या नातवंडांनी विचारलं तर तुला मान खाली घालावी लागू नये म्हणून मी आजच अंधारावर चालून जाणार आहे. तुम्हीही माेठ्या संख्येने याल ही खात्री आहे,’’ असा विश्वास प्रत्येक पुणेकर महिला व्यक्त करीत आहे. मुठा नदीपात्रात शुक्रवारी रात्री अंधारावर चालून जाण्याची जय्यत तयारी करत आहे, असेच चित्र शहराच्या सर्व भागात वर्षातील सर्वांत माेठ्या रात्रीच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळाले.
एका कवीच्या भाषेत सांगायचे झाल्यास,
‘‘वस्त्रहरण आता हाेणे नाही,
अपहरणाचा मुद्दाच नाही...
रस्त्यावर आज उतरणार वाघिणी,
अंधारावर चालून जाणार रातरागिणी... रातरागिणी!
तिची परीक्षा हाेणे नाही,
अग्निपरीक्षेचा मुद्दाच नाही,
तुरुंग फाेडत आज निघाल्या तेजस्विनी,
अंधारावर चालून जाणार रातरागिणी!
एकमेकाचं भांडण नाही,
शरीर तिची ही ओळख नाही,
व्यवस्थेवर मात कराया निघाल्या रणरागिणी
अंधारावर चालून जाणार रातरागिणी!
अंनतकाळाचीही माता नाही,
फक्त अल्पकाळाची पत्नीही नाही,
जुन्या व्याख्या खाेडत निघाल्या साैदामिनी
अंधारावर चालून जाणार रातरागिणी!
देवीचे सिंहासन नाही,
पायीचे वाहन नाहीच नाही
आज देव्हारे पाडतील बंधिनी
अंधारावर चालून जाणार रातरागिणी!
असा निर्धार प्रत्येक तरुणी आणि महिलेने केला आहे. या रातरागिणी हाती मशाल घेऊन अलका टाॅकीज चाैक ते शनिवार वाडा चालत जाणार आहेत.
तापमानाचा पारा उतरेल... अडथळेही बरेच येतील... अनेकजण तुझी वाटदेखील अडवतील; पण, तू मागे फिरू नकोस. कारण, आज मागे फिरलीस तर अंधार आणखी आक्रमक होत जाईल. यावर माेठ्या हिमतीने मात केलीस आणि या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार हाेऊ शकलीस तर काही वर्षांनी तुला तुझी लहानगी मुलं, नातवंडं, पतवंडं प्रश्न केल्यानंतर ‘तेव्हा तू अभिमानाने सांगशील ‘मी आवाज उठवला हाेता म्हणून.’ वर्षातल्या सगळ्यात मोठ्या रात्रीवर चालून गेले मी. तेव्हा शनिवारवाडाच काय, अनेक चिरेबंदी वाडेही हादरले होते तेव्हा!
कधी तरी तूही स्वतःच्या घराची बेल पहाटे दाबायला अथवा मध्यरात्री जाऊन कडी वाजवायला काय हरकत आहे? तुही रात्री घराबाहेर पडायला काय हरकत आहे? आजवर त्यांनी तुला अंधाराची भीती दाखवली आणि तुही घाबरलीस. असे घाबरायचे कशाला? अंधाराची भीती दाखवतात पुरूष आणि अंधारात घाबरवतात तेच. जे समाजकंटक आहेत, त्यांचा करा बंदोबस्त. नजरा बदला, तुम्ही स्वतःच्या. आम्हाला का दाखवता अंधाराचे भय? “आता आम्ही घरात कोंडून घेणार नाही. आता तुम्ही आम्हाला तुरुंगात डांबू शकत नाही.” हे आता सांगावे लागेल आणि अंधारावर मात करण्यासाठी उतरावे लागेल.
हजारो महिला उद्या मात करताहेत अंधारावर. अशावेळी आपणही असावे, असे तुला वाटत नाही? आम्ही रडणाऱ्या नव्हतो. तर, लढणाऱ्या होतो, हे सांगावेसे तुला वाटत नाही? एक खणखणीत संदेश द्यावा, असे वाटत नाही. वाटते ना? मग खोटी कारणे सांगू नकोस. इतरांसाठी एवढे केलेस. स्वतःसाठी आज रस्त्यावर उतर. सावित्रीबाई, फातिमाबी, आनंदीबाई अशाच रस्त्यावर उतरल्या म्हणून तू एवढे करू शकलीस ना? मग तुला मागे राहून कसे चालेल? तुला शरीरात बंद करण्याचा, देव्हाऱ्यात कैद करण्याचा, तुझे माणूसपणाचे हक्क नाकारण्याचा हा कट तू उधळून लाव. तुला अनंतकाळाची माता करून, हे स्वतः मात्र अनंतकाळचे ‘पुरूष’ होत असतात, हे लक्षात ठेव. त्यासाठी तुलाच अंधारावर चालून जावे लागेल. तुला जे कपडे आवडतात, त्या पेहरावात, तुझ्या शैलीने, तुझ्या पद्धतीने तुला यायचे आहे!
आणि हो, पुरुषांना या ‘वॉक’मध्ये चालण्याची परवानगी नाही. कारण, रातरागिणींचा आहे हा वॉक! पण, काहींना या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे असेल, तर प्रेक्षक म्हणून पाहू शकतात हे सेलीब्रेशन. मुळात हे सेलीब्रेशन आहे. गाणी, गप्पा, नाटक, पोवाडे, भजन, नृत्य, फ्लॅशमॉब, फायरगेम्स असं बरंच काही असेल इथे. खाऊगल्लीही आहे. ज्यांना ‘कार्यकर्ता’ म्हणून मदत करायचीय, ते आम्हाला कळवू शकतात. तुमच्यासमोर इतिहास घडत असताना तुम्ही दूर कसे राहू शकाल?
आज वर्षातील सगळ्यात मोठी रात्र आहे. ही रात्र कितीही घाबरवणारी असली, तरी त्यावर एकदा मात केली की, मग भ्यायचे कारण नाही. ‘आम्ही सक्षम आहोतच. तुम्ही तुमची नजर बदला’, हा संदेश देत हा वॉक शनिवारवाड्यावर येईल. तिथे मशाली पेटतील.
आज तुला चालायचे आहे, ते स्वतःच्याच शोधासाठी.
तू खुद की खोज में निकल
तू किस लिए हताश है,
तू चल तेरे वजूद की
समय को भी तलाश है!
आम्ही सारे तुझी वाट पाहतोय!