रात्रीच्या अंधारावर चालून जाऊ... आम्ही जाणारच; तुम्हीही या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:55 AM2023-12-20T11:55:07+5:302023-12-20T11:55:17+5:30
‘लोकमत’च्यावतीने २२ डिसेंबर रोजी निघणाऱ्या ‘रातरागिणी’ नाईट वाॅकमध्ये आम्ही सहभागी होऊ, तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन विविध क्षेत्रातील महिलांनी केले आहे....
पुणे : पुरुषांनी आम्हाला आता रात्रीचे भय दाखवू नये... वर्षातील सर्वांत मोठ्या रात्रीच्या अंधारावर आम्ही चालून जाणार आहाेत, तेही नदीपात्रातून. हा केवळ आमचा नाईट वॉक नाही तर आमच्या फिरण्यावर, स्वातंत्र्यावर लादलेल्या बंधनाविरोधाचा विद्रोह आहे, इथे आम्ही गाऊ, नाचू, मौजमजा करू. ‘लोकमत’च्यावतीने २२ डिसेंबर रोजी निघणाऱ्या ‘रातरागिणी’ नाईट वाॅकमध्ये आम्ही सहभागी होऊ, तुम्हीही सहभागी व्हा, असे आवाहन विविध क्षेत्रातील महिलांनी केले आहे.
‘लोकमत’चा हा उपक्रम महिलांना एक वेगळ्या प्रकारची सामाजिक शक्ती देणारा आहे. या सामूहिक कृतीतून समाजात निर्भयतेचा संदेश जाणार आहे. अंधारावर मात करा याचा अर्थ ‘अन्याय, अत्याचार यांचा प्रतिकार करायला शिका, त्याला बळी पडू नका’ असा आहे. महिलांमध्ये आंतरिक शक्ती असतेच, ती अशा उपक्रमांमधून पुढे येईल. आमच्या उपक्रमातील सर्व महिला यात नक्की सहभागी होतील.
- डॉ. मेधा पुरव-सामंत, कार्यकारी संचालक, अन्नपूर्णा परिवार
आजच्या जागतिकीकरणाच्या बाजारू जगात पैसा म्हणजे सर्वस्व आहे. दिल मांगे मोर हे ब्रीदवाक्य बनलं आहे. याच हव्यासातून माणुसकी पायदळी तुडवत सर्वच पैशांमागे पळत सुटले आहेत. शाहू, फुले, गांधी, आंबेडकर आदी महापुरुषांनी स्त्रीचा माणूसपणाचा हक्क, अधिकार मिळवून दिला. परंतु आजच्या धर्मांध, पुरुषप्रधान राजकारणात स्त्रीचा आचार, विचार आणि विहाराचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तो अधिकार उजागर करण्यासाठी लोकमत रातरागिणी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या हितचिंतक मंडळी यात सहभागी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या उपक्रमाला दिल से शुभेच्छा!
- गीताली वि. मं. संपादक, मिळून साऱ्याजणी मासिक आणि पुरुष उवाच दिवाळी अंक
भीतीला, त्यातही पुरुषांनी घातलेल्या भीतीला दूर सारणं हे महिलांसाठी फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी ती पुढचे पाऊल टाकू शकत नाही. ही भीती घालवण्यासाठी एकत्र येणे हेही गरजेचे असते. त्यासाठी निर्भय नाईट वॉक महत्त्वाचे आहे. एकत्र येऊन सामुदायिकरीत्या भीतीवर, अंधारावर मात करणे यातून होणार आहे. आमच्या महापालिका कामगार युनियनच्या सर्व महिला यात नक्की सहभागी होतील.
- मुक्ता मनोहर, सरचिटणीस, महापालिका कामगार युनियन
महिलांसाठी अशा वेगळ्या व नावीन्यपूर्ण उपक्रमांची फार आवश्यकता आहे. त्यांनाही मोकळेपणाने समाजात वावरता यायला हवे. त्यांच्यावरची बंधने त्यांना असे करू देत नाहीत. चांगली आहेत अशी बंधने महिला स्वत: होऊनच पाळतात, मात्र जे जाचक आहे, त्रासदायक आहे, प्रगतीत अडथळा निर्माण करणारे आहे, त्याचा त्याग करण्यासाठी अशा प्रकारची सामुदायिक कृती गरजेची असते. ‘लोकमत’च्या या निर्भय नाईट वॉकला शुभेच्छा. आम्ही आमच्या कार्यकर्त्या महिलांसह यात सहभागी होणार आहोत.
- हर्षदा फरांदे, शहराध्यक्ष, भाजप महिला आघाडी
महिलांना कायम कसली ना कसली भीती दाखवली जाते आणि प्रगतीपासून मागे खेचले जाते. आता काळ बदलला आहे. असे चालणार नाही. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि अनेकदा तर पुरुषांपेक्षाही चांगले काम करतात. आता त्यांना अंधाराची नव्हे तर कसलीच भीती दाखवता येणार नाही हे या उपक्रमातून सांगता येईल. त्यासाठीच आम्ही आमच्या महिला कार्यकर्त्यांसह यात सहभागी होणार आहोत.
- संगीता ठोसर, शहर संघटक, शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडी
आजच्या युगात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. प्रत्येक गोष्टीत ती आघाडीवर असते. तरीही तिला मागे खेचले जाते. हे थांबवायचे असेल तर अशा उपक्रमांची गरज आहे. यातून महिलांना आत्मविश्वास तर मिळेलच, शिवाय समाजातही योग्य तो संदेश पोहोचेल. मी स्वत: आमच्या सर्व महिला कार्यकर्त्यांसह निर्भय नाईट वॉकमध्ये सहभागी होईन.
- वर्षा तापकीर, सरचिटणीस, पुणे शहर भाजप