लोकमत रातरागिणी : होय सखे, उद्या तू इतिहास घडवणार आहेस!

By संजय आवटे | Published: December 21, 2023 09:36 AM2023-12-21T09:36:05+5:302023-12-21T09:37:49+5:30

काही वर्षांनी तुला तुझी लहानगी मुलं, नातवंडं, पतवंडं विचारतील. “त्या काळात फक्त नकार दिला म्हणून मुलींवर कोयत्याने हल्ले होत होते.....

Lokmat Ratragini : Yes dear, tomorrow you will make history! | लोकमत रातरागिणी : होय सखे, उद्या तू इतिहास घडवणार आहेस!

लोकमत रातरागिणी : होय सखे, उद्या तू इतिहास घडवणार आहेस!

सखे,

उद्या तापमानाचा पारा उतरेल. अडथळेही बरेच येतील. अनेक जण तुझी वाट अडवतील; पण तू मागे फिरू नकोस. कारण, आज मागे फिरलीस तर अंधार आणखी आक्रमक होत जाईल.

काही वर्षांनी तुला तुझी लहानगी मुलं, नातवंडं, पतवंडं विचारतील. “त्या काळात फक्त नकार दिला म्हणून मुलींवर कोयत्याने हल्ले होत होते. त्यांच्यावर अत्याचार होत होते. गर्भात मुलींना मारलं जात होतं आणि नवजात मुलींना संपवलं जात होतं. तेव्हा तू काय करत होतीस?” तेव्हा तू एवढं सांगशील खात्रीनं- तेव्हा मी गप्प नव्हते बसलेले. वर्षातल्या सगळ्यात मोठ्या रात्रीवर चालून गेले मी. शनिवारवाडाच काय, अनेक चिरेबंदी वाडेही हादरले होते तेव्हा!

कधी तरी तूही स्वतःच्या घराची बेल पहाटे दाबायला अथवा मध्यरात्री जाऊन कडी वाजवायला काय हरकत आहे? तूही रात्री घराबाहेर पडायला काय हरकत आहे? आजवर त्यांनी तुला अंधाराची भीती दाखवली आणि तूही घाबरलीस. असे घाबरायचे कशाला? अंधाराची भीती दाखवतात पुरुष आणि अंधारात घाबरवतात तेच. जे समाजकंटक आहेत, त्यांचा करा बंदोबस्त. नजरा बदला तुम्ही स्वतःच्या. आम्हाला का दाखवता अंधाराचे भय? “आता आम्ही घरात कोंडून घेणार नाही. आता तुम्ही आम्हाला तुरुंगात डांबू शकत नाही.” हे आता सांगावे लागेल आणि अंधारावर मात करण्यासाठी उतरावे लागेल.

हजारो महिला उद्या मात करताहेत अंधारावर. अशा वेळी आपणही असावे, असे तुला वाटत नाही? आम्ही रडणाऱ्या नव्हतो, तर लढणाऱ्या होतो, हे सांगावेसे तुला वाटत नाही? एक खणखणीत संदेश द्यावा, असे वाटत नाही. वाटते ना? मग खोटी कारणे सांगू नकोस. इतरांसाठी एवढे केलेस. स्वतःसाठी आज रस्त्यावर उतर. सावित्रीबाई, फातिमाबी, आनंदीबाई अशाच रस्त्यावर उतरल्या म्हणून तू एवढे करू शकलीस ना? मग तुला मागे राहून कसे चालेल? तुला शरीरात बंद करण्याचा, देव्हाऱ्यात कैद करण्याचा, तुझे माणूसपणाचे हक्क नाकारण्याचा हा कट तू उधळून लाव. तुला अनंतकाळची माता करून, हे स्वतः मात्र अनंतकाळचे ‘पुरुष’ होत असतात, हे लक्षात ठेव. त्यासाठी तुलाच अंधारावर चालून जावे लागेल. तुला जे कपडे आवडतात, त्या पेहरावात, तुझ्या शैलीने, तुझ्या पद्धतीने तुला यायचे आहे!

आणि हो. पुरुषांना या ‘वॉक’मध्ये चालण्याची परवानगी नाही. कारण, रातरागिणींचा आहे हा वॉक! पण, काहींना या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे असेल, तर प्रेक्षक म्हणून पाहू शकतात हे सेलिब्रेशन. मुळात हे सेलिब्रेशन आहे. गाणी, गप्पा, नाटक, पवाडे, भजन, नृत्य, फ्लॅशमॉब, फायरगेम्स असं बरंच काही असेल इथे. खाऊगल्लीही आहे. ज्यांना ‘कार्यकर्ता’ म्हणून मदत करायचीय, ते आम्हाला कळवू शकतात. तुमच्यासमोर इतिहास घडत असताना तुम्ही दूर कसे राहू शकाल?

आज वर्षातील सगळ्यात मोठी रात्र आहे. ही रात्र कितीही घाबरवणारी असली, तरी त्यावर एकदा मात केली की मग भ्यायचे कारण नाही. ‘आम्ही सक्षम आहोतच. तुम्ही तुमची नजर बदला’, हा संदेश देत हा वॉक शनिवारवाड्यावर येईल. तिथे मशाली पेटतील.

आज तुला चालायचे आहे, ते स्वतःच्याच शोधासाठी.

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है,

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है!

आम्ही सारे तुझी वाट पाहतोय!

Web Title: Lokmat Ratragini : Yes dear, tomorrow you will make history!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.