लोकमत रिपोर्ताज : तब्बल ४२ तपासण्यानंतर मिळते पुणेकरांना शुद्ध पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:28 AM2023-02-01T09:28:41+5:302023-02-01T09:29:47+5:30

गढूळ पाणी ते पिण्यायोग पाण्याचा असा होतो प्रवास...

Lokmat Report: Pune residents get clean water after as many as 42 inspections | लोकमत रिपोर्ताज : तब्बल ४२ तपासण्यानंतर मिळते पुणेकरांना शुद्ध पाणी

लोकमत रिपोर्ताज : तब्बल ४२ तपासण्यानंतर मिळते पुणेकरांना शुद्ध पाणी

Next

- श्रीकिशन काळे

पुणे :पाणी शुध्द कसे होते? ते जाणून घेण्याच्या उत्सुकतेने पर्वती जलशुध्दीकरण केंद्र गाठले. वेळ सकाळी ११ वाजताची. प्रयोगशाळेत दररोज पाण्याची तपासणी करणारे केमिस्ट मंदार सरदेशपांडे भेटले आणि त्यांनी जलशुद्धीकरणाचा संपूर्ण पटच समाेर मांडला.

केमिस्ट मंदार सरदेशपांडे म्हणाले की, पुणे शहराला हाेणारा पाणीपुरवठा हा मुठा नदीवर बनवलेल्या खडकवासला धरणातून येताे. अशुद्ध पाण्यामुळेच अनेक रोगांचा फैलाव होत असताे. त्यामुळे ताे धाेका टाळण्याकरिता पुणेकरांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून महापालिका काेट्यवधी रुपये खर्च करते.

पुणे शहराला एकूण ११ जलकेंद्रांद्वारे पाणी दिले जाते. या केंद्रांमार्फत दररोज १६५० दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. जलशुध्दीकरण प्रकल्पाद्वारे प्रक्रिया करूनच हे शुद्ध पाणी घराघरात पोहोचवले जाते. पाणी पुरवठा करताना त्याचा दर्जा आयएसआय १० हजार ५०० मानांकन या निकषांवर नियंत्रित केला जातो, असेही सरदेशपांडे यांनी सांगितले.

शहरात १६ सॅम्पल कलेक्टर नियुक्त

पाण्याचा दर्जा कायम आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी पर्वती व लष्कर पाणीपुरवठा केंद्रामध्ये प्रयोगशाळा आहेत. यात दररोज सुमारे ९५ टाक्यांमधून पाण्याचे नमुने तपासले जातात. तसेच स्थानिक पातळीवर १२५ ते २५० पाण्याचे नमुने नागरिकांकडून घेतले जातात. त्यासाठी शहरात १६ सॅम्पल कलेक्टर नियुक्त आहेत. त्यांच्या मोबाईलवर ट्रॅकर लावले असून, ते सॅम्पल घेत असल्याचे ट्रॅकिंग प्रयोगशाळेतील मोबाईलवर दिसते, असे केमिस्ट मंदार सरदेशपांडे यांनी सांगितले. मोबाईलवर त्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखविले.

पुणेकरांना मिळणारे पिण्याचे पाणी हे तब्बल ४२ तपासण्यांमधून येते. त्यातील गढूळपणा, बॅक्टेरिया, माती बाजूला काढून पिण्यायोग्य पाणी नळाद्वारे पुरविले जाते. घराघरात येणाऱ्या पाण्यावर कोट्यवधींचा खर्च होतो. यासाठी मनुष्यबळही दिवसरात्र काम करत आहे. खडकवासला धरणातील पाणी ते घराेघरी नळाद्वारे मिळणारे पिण्यायोग्य पाणी या दरम्यानचा पाण्याच्या शुध्दीकरणाचा अनोखा प्रवास ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन अनुभवला. त्याचा हा खास रिपाेर्ताज.

गढूळ पाणी ते पिण्यायोग पाण्याचा असा होतो प्रवास?

- पुणे शहराची लोकसंख्या ४० लाखांहून अधिक आहे. खडकवासला धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या वरच्या बाजूला पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही तीन धरणे आहेत. खडकवासला जलाशयातील पाणी कालवा आणि जलवाहिन्यांद्वारे शहरातल्या जलशुध्दीकरण केंद्रांपर्यंत आणले जाते. पाण्याचा पुरवठा हा काही भागात गुरूत्वाकर्षणाने होतो, तर उंच भागात पाणी उचलण्यासाठी पंप वापरण्यात येतात. शहरात ठिकठिकाणी पंपिंग स्टेशन्स असून, ९५ टाक्यांद्वारे पाणी साठवण्यात येते.

- खडकवासलामधून गढूळ पाणी जलशुध्दीकरण केंद्रात पाईपद्वारे येते. तिथे पहिल्यांदा तुरटी आणि पॉलिॲल्युमिनियम क्लोराइडद्वारे पाण्यातील गढूळपणा काढला जातो. त्यामुळे जड घटक पाण्याखाली जातात. याला प्री क्लोरिनेशन म्हटले जाते.

- पहिल्या क्लोरिनेशनंतर पाणी आधुनिक पल्ससेटर टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थेमध्ये नेले जाते. इथे पाणी ढवळून सेट केले जाते. त्यातील गाळ खाली बसविला जातो. त्याला पल्ससेटर टेक्नॉलॉजी म्हटले जाते. त्यानंतर हे निवळलेले पाणी १६ फिल्टर बेडमध्ये सोडले जाते. यामध्ये ३ फूट उंच बारीक वाळूचा थर असतो. त्यातून पाणी गाळले जाते.

- वाळूच्या खाली गाळण्या असतात, तिथे नोझल लावलेले असतात. त्यातून पाणी खाली पाईपमधून पंपिंगला जाते. तिथे जाऊन पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. त्यानंतर क्लोरिनेशन केले जाते. तिथून पाणी पाईपद्वारे शहरातील टाक्यांमध्ये आणि मग घराघरात जाते. ते पाणी पिण्यायोग असते. पाण्याचा हा शुध्दीकरणाचा प्रवास पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातील केमिस्ट संजय राऊत यांनी दाखविला.

पाण्याचा वापर करा जपून :

घरात येणाऱ्या पाण्याची किंमत आपण करत नाही, कारण त्यामागचे कष्ट आपल्याला माहीत नसतात. घरात नळाला येणाऱ्या पाण्यावर हाेणारा खर्च आणि श्रम काय आहेत, हे जलशुद्धीकरणाचा संपूर्ण प्रवास अनुभवल्यानंतर कळेल. हा प्रवास जाणून घेत पुणेकरांना पाण्याचा वापर अतिशय जपून करायला हवा, असे नम्रपणे नमूद करावे वाटते.

येथे हाेते तपासणी!

जलशुद्धीकरण केंद्रापासून लांबवर असलेल्या वसाहतीत किंवा घरांमध्ये पाणी पोहोचेपर्यंत क्लोरिनचे प्रमाण कायम राहावे, यासाठी पाण्यात क्लोरिनची मात्रा योग्य मिसळली जाते. पाण्यामध्ये सर्व ठिकाणी क्लोरिनचे प्रमाण सारखे आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी पावसाळ्यात २५० हून अधिक पाण्याचे नमुने दररोज तपासले जातात. इतरवेळी दररोज टाक्यांमधून ९५ सॅम्पल आणि नागरिकांकडून १२५ ते २५० सॅम्पल घेतले जातात. हे नमुने पर्वती व लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात तपासले जातात. या नमुन्यांमध्ये क्लोरिनचे प्रमाण कमी आढळल्यास त्याची कारणे काय आहेत, याची खातरजमा केली जाते. त्या त्या ठिकाणी पाण्यात क्लोरिनचे योग्य प्रमाण राहील याची दक्षता घेतली जाते.

अशी जपली जाते क्लोरिनची मात्रा :

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकांनुसार पाण्यात कमीत कमी क्लोरिनचे प्रमाण ०.२ मिलिग्रॅम प्रती लिटर ठेवले जाते. हे पाणी बॅक्टेरियामुक्त असते, जे पिण्यासाठी योग्य असते. पाणी शुध्दीकरणासाठी येते तेव्हा त्यात सुरुवातीला ३ मिलिग्रॅम प्रती लिटर डोस दिला जातो. ते घरापर्यंत जाईपर्यंत त्याची मात्रा ०.२ मिलिग्रॅम होते आणि ते पिण्यायोग्य आहे.

पाणीपुरवठ्याचा इतिहास काय?

- पुणे हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. ते वेगाने वाढत असून, लोकसंख्याही खूप आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची गरज निर्माण होत आहे. त्यात पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शहराचे हवामान हे समशीतोष्ण प्रकारचे आहे. टेकड्या हे पुण्याचे भौगोलिक वैशिष्ट्य आहे. अनेक छोट्या-मोठ्या टेकड्यांनी शहर वेढले आहे. कात्रज आणि पाषाण हे दोन मोठे तलाव शहरात आहेत. त्यापैकी पाषाणचा तलाव हा नैसर्गिक, तर कात्रज तलाव हा मानवनिर्मित आहे. पुणे शहरात वार्षिक सरासरी ७१४ मिलिमीटर पाऊस पडतो.

- पेशव्यांच्या काळात पुणे शहरासाठी पाणीपुरवठ्याची अभिनव योजना तयार केली गेली. १७५० मध्ये नानासाहेब पेशवे यांनी दक्षिणेस कात्रज इथे तलाव बांधून तिथून दगडी भुयारी नळांद्वारे थेट शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणले. या ५ ते ६ मैलांच्या प्रवासात जवळपास १२५ उच्छवास बांधण्यात आले. हे उच्छवास म्हणजे जागोजागी या भुयारांना असलेली दारे. या दगडी नळांतून शुद्ध पाणी जावे म्हणून कात्रज तलावाची वैशिष्ट्यपूर्ण रचना केली होती. शिवाय नळाच्या बांधकामातही पाण्यात गाळ राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. या योजनेद्वारे त्या वेळच्या पुणेकरांना अखंडित व अष्टौप्रहर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात होता. हे पाणी पेठांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या हौदांमध्ये साठवले जात असे. यापैकी काही हौद आजही सुस्थितीत आहेत.

शहरातील ११ जलशुद्धीकरण केंद्रे आणि त्याची                        क्षमता (एमएलडी)

पर्वती (२)                         ५००

लष्कर                         ३६०

होळकर (खडकी) (२)             २५

वारजे प्रकल्प                        १००

वडगाव प्रकल्प (२)             १००

वारजे प्रादेशिक योजना             १०

चिखली                         १००

भामा आसखेड             २००

या केंद्रांतून पाणी शुद्ध करून त्या त्या परिसरातील भागांना पुरविले जाते. शहरात दररोज १६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. हे प्रमाण दर माणशी दर दिवशी सरासरी २५० लिटर आहे. केेंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या निकषांप्रमाणे ही गरज दर माणशी दर दिवशी सरासरी १५० लिटर आहे.

शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे

जलसाठा - पाणीवहन- जलशुद्धीकरण केंद्र - पाण्याची टाकी - घराघरात पाणी.--------

पाण्यातून तीन ते चार ट्रक माती बाजूला...

दररोज पाणी शुद्ध करताना त्यातील जड घटक, माती आदी बाजूला केली जाते. अशी दररोज तीन ते चार ट्रक माती जमा होते. ती माती ट्रकद्वारे शेतीला वापरण्यासाठी पाठविली जाते.

 

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर ढवळणे, निवळणे, निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर क्लोरिनेशन करून ते घराघरात पाठविले जाते. घरात येणाऱ्या पाण्यात ०.२ मिलीग्रॅम क्लोरिन असायला हवे. ते असणे म्हणजे पाणी निर्जंतूक आहे. या पाण्यावर ४२ तपासण्यात होतात. पुण्यातील प्रयोगशाळा ही राज्यातील एकमेव व सर्वाेत्तम आहे. इतर कुठेही अशी सोय नाही. मुंबईमध्येही नाही. त्यामुळे पुणेकर पाण्याबाबत नशीबवान आहेत.

- मंदार सरदेशपांडे, केमिस्ट, पर्वती जलशुद्धीकरण प्रयोगशाळा

Web Title: Lokmat Report: Pune residents get clean water after as many as 42 inspections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.