लोकमत वुमेन समीट २०१९ : आता रडायचे नाही, लढायचे..!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:38 AM2019-07-24T11:38:55+5:302019-07-24T11:39:20+5:30
महिलांना अपमानास्पद वागणूक मिळते. मात्र, आपण सर्व सावित्रीच्या लेकी आहोत.
पुणे : प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवले की आरडाओरड होते, शिंतोडे उडवले जातात. महिलांना अपमानास्पद वागणूक मिळते. मात्र, आपण सर्व सावित्रीच्या लेकी आहोत. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला नेतृत्व करायला शिकवले. रडायचे नाही लढायचे, हा कानमंत्र त्यांनी आपल्याला दिला. त्यामुळेच स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत नेतृत्वाकडे झेप घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशा शब्दांत ‘सावित्रीच्या लेकीं’नी संघर्षाचा पट उपस्थितांसमोर मांडला.
सावित्रीबाई फुले यांना समर्पित ‘दगडांचा मारा’ या चर्चासत्रात परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या महिलांना समाजाकडून कसा विरोध होतो, यावर विचारमंथन झाले. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत, महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या तृप्ती देसाई आणि कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्या ऐश्वर्या तमाईचीकर यामध्ये सहभागी झाल्या होत्या. लीना सलढाणा यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
गौरी सावंत म्हणाल्या, ‘तुम्ही अजूनही तुमच्या हक्कासाठी भांडत आहात. हे भांडण अनेक वर्षे चालेल. तुमच्या या भातुकलीच्या खेळात मी कुठे आहे? पोह्यातील खडयाप्रमाणे मी बाजूला पडले आहे. माझ्या आया- बहिणींनी अनेक घाव सोसले. माझ्या अस्तित्वालाच समाजाने नाकारले. आमची जागा अजूनही सिग्नलच्या बाजूलाच आहे. माझी टाळी हा माझा आक्रोश आहे. सहा मीटर साडी नेसून टाळी वाजवत रस्त्यावर फिरण्याची किंमत तुम्हाला कळणार नाही. मीही सावित्रीची लेक आहे, हे तुम्ही सहजासहजी स्वीकारणार नाही.’
तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी खूप झगडावे लागले. आमचे आंदोलन म्हणजे स्टंट आहे असे आरोप झाले. एकविसाव्या शतकात मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करावा लागतोय, यासारखी शोकांतिका नाही. संविधानाने महिलांना समानतेचा हक्क दिला आहे. तो नाकारणारे तुम्ही कोण? देव भेदभाव करत नाही. त्यामुळे भेदभावविरोधात आवाज उठवायला हवा. मरण आले तरी लढत रहायचे, असे ठरवले होते. घरात हार्ट अॅटॅक येऊन मरण्यापेक्षा समाजासाठी काम करताना मरण आले तरी चालेल. कोणतेही चांगले काम करताना भीती बाळगू नका. माघार घेतली नाही तर इतिहास नक्की घडतो. इच्छाशक्ती प्रबळ असेल, कमालीची जिद्द असेल तर विजय तुमचाच आहे.
------------
ऐश्वर्या तमाईचीकर -
कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी ही अघोरी प्रथा आहे. लग्नानंतर मुलीची कौमार्य चाचणी करून मगच तिचा स्वीकार केला जातो. मुलींवर लहानपणापासून तसेच संस्कार केले जातात. माझ्याही मनावर तेच बिंबवले गेले. पण माझ्या पतीने त्यास विरोध केला. तेव्हापासून ही चळवळ हाती घेतली. आपलेच लोक आपल्या कार्याला विरोध करतात तेव्हा खूप वेदना होतात. मात्र, हक्कांसाठी लढलेच पाहिजे. आजही अनेक समस्यांच्या मुळाशी अंधश्रध्दा आहेत. त्याच्याशी लढा देणे क्रमप्राप्त आहे.
----------
गौरी सावंत
स्वत:च्या हक्कासाठी मला २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टात जावे लागले. मूलभूत हक्कासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणे ही शोकांतिका आहे. कोर्टाने आधार कार्डवर ओळख दिली. परंतु, विकासाच्या प्रक्रियेत आजही आम्हाला सामावून घेतले जात नाही. न्यायालयाचा निकाल येऊनही तृतीयपंथीयांना न्याय मिळत नाही. आमची जनगणनाच सरकारकडे नाही. आम्हाला भीक नको आहे, हक्क मागत आहोत. शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्क्रिनिंग कमिटी तयार केली आहे. स्त्री आणि पुरुषांना अशी चाचणी करावी लागते का? मग आम्हालाच का? मलाही सामान्य महिलेप्रमाणे जगायचे आहे, नोकरी करायची आहे. मी भाजीही विकेन, पण तुम्ही ती विकत तर घ्यायला हवी. मी शिक्षिका झाले तर मुलांना शिकवू शकेन, त्यांच्याशी आमची मैत्री होईल. मुलांच्या मनातील तृतीयपंथीयांबद्दलची भीती नाहीशी होईल.