लोकमत वुमेन समीट २०१९ : आयुष्याची गोष्ट ते यशोगाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:18 PM2019-07-24T12:18:56+5:302019-07-24T12:20:18+5:30
आपल्या आयुष्याची गोष्ट यशोगाथेमध्ये रुपांतरित झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रबळ आत्मविश्वास असला पाहिजे...
पुणे : स्वत:ची ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया महिलांसाठी तितकीशी सोपी नसते. सक्षमीकरणाची लढाई सुरु असली तरी समाजाची मानसिकता पूर्णपणे बदललेली नाही. मात्र, लोक काय म्हणतील याचा विचार न करता प्रत्येकीने स्वत:ला घडवायला हवे. आपल्या आयुष्याची गोष्ट यशोगाथेमध्ये रुपांतरित झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रबळ आत्मविश्वास असला पाहिजे, असे आवाहन विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी केले.
महिला आज व्यक्त होऊ लागल्या आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांनी दाखविलेल्या वाटेवर चालत आहेत. लोकमत वुमेन समिटमध्ये ‘ती’ची गोष्ट’ या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, प्रसिद्ध लेखिका श्रीमोयी पियू कुंडू, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी सहभागी झाल्या होत्या.
राजश्री देशपांडे म्हणाल्या, ‘मी कोण आहे, माझी ओळख काय या प्रश्नाचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. कारण, अजूनही मी स्वत:चा शोध घेत आहे. औरंगाबादसारख्या शहरातून मी शिक्षणासाठी पुण्यात आले. कष्ट करुन स्वत:ला घडवायचे होते, काहीतरी करायचे होते, पण नेमके काय ते कळत नव्हते. आजही हे कोडे उलगडलेले नाही. आजपर्यंत प्रवासाचा आनंद घेत चालत राहिले आहे. आपण ध्येयाच्या मागे पळत राहतो आणि स्वत:ला विसरतो. मला स्वत:ला विसरायचे नाही. स्त्री आणि अभिनेत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. मी पाच वर्षांपूर्वी दोन गावे दत्तक घेतली आहेत. तेथील विकासासाठी काम करायचे आहे.’
उद्योजिका सुजाता चॅटर्जी म्हणाल्या, ‘सध्या आपण रिटेलच्या जगात वावरतो आहोत. प्रत्येकीच्या घरी कपाट भरुन कपडे असतील. पण, गरजूंना कपडे मिळणे ही अडचण असते. त्यामुळे आम्ही कपडे दान करण्याचे, कपड्यांचा पुनर्वापर करण्याचे ठरवले. उद्योगाचा काहीही अनुभव नसताना नकारात्मकता दूर सारुन काम केले. आजवर आम्ही १५ हजार गरजूंपर्यंत कपडे पोहोचवले आहेत. आमच्याकडे काम करणा-या सर्व महिला असल्याने स्त्रियांना रोजगार मिळाला आहे. चांगल्या कामात खारीचा वाटा उचलल्याचे समाधान वाटते.’
गुरलीन पुरी म्हणाल्या, ‘मी वयाच्या अठराव्या वर्षी कामाला सुरुवात केली. व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना उभी राहिले. स्वत:वर विश्वास ठेवा, काम करत रहा. आपल्याला जे वाटते ते बिनधास्त करत राहा. यश नक्कीच तुमचे आहे.’
------------
प्रत्येकजण स्त्री सक्षमीकरणाबाबत बोलत आहे. मात्र, अजूनही चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. मी वैद्यकीय शिक्षण सोडून बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा खूप विरोध झाला. तुझ्या आडनावाला स्टारडम नाही, तू कोणत्याही अभिनेत्याला डेट करत नाहीस, तुझा कोणी गॉडफादर नाही, मग तुला अभिनेत्री का व्हायचे आहे, असा प्रश्न दिग्दर्शकाने विचारला. या कोणत्याही गोष्टीपेक्षा मेहनत जास्त महत्वाची आहे, हे मी त्याला खडसावून सांगितले. लोकांना ज्ञान पाजळू दे, आपण कोणाचीही पर्वा न करता काम करत रहावे.
- सौंदर्या शर्मा
-----------
स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आपण लढले पाहिजे. माझे वडील खूप लवकर वारल्याने आईने मला लहानाचे मोठे केले. मी इतिहासाचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुरातत्वशास्त्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. त्यावेळी मी महाविद्यालयाच्या वर्तमानपत्राची संपादक होते, लिहिण्यात रमत होते. पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि राष्ट्रीय संपादकपदापर्यंत मजल मारली. महिलांच्या समस्या, भावविश्व पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. एकट्या महिलाही खंबीर असतात. प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेला पाठिंबा दिला पाहिजे.
- श्रीमोयी पोयू कुंडू