लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना जाहीर
By श्रीकिशन काळे | Published: March 26, 2024 04:51 PM2024-03-26T16:51:55+5:302024-03-26T16:52:06+5:30
आनंद पटवर्धन हे गेली पाच दशके सामाजिक-राजकीय विषयांवर माहितीपट तयार करत आहेत
पुणे : थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा असा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२४’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना जाहीर केला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेतला.
भाई वैद्य फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा भाई वैद्य यांच्या सहाव्या स्मृतिदिनी म्हणजे मंगळवार दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी, संध्याकाळी ५ वाजता एस. एम. जोशी फौंडेशन मुख्य सभागृह, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजवादी विचारवंत डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आनंद पटवर्धन हे गेली पाच दशके सामाजिक-राजकीय विषयांवर माहितीपट तयार करीत आहेत. भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अनेकविध आणि विवाद्य विषयांवर त्यांनी माहितीपट तयार केले आहेत. यामुळे त्यांच्या अनेक माहितीपटींवर कधी बंदी घालण्यात आली, तर कधी त्याविरुद्ध गदारोळ उठवण्यात येवून त्यांना न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, आनंद पटवर्धन यांनी न डगमगता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यात यश मिळवले.