मतदारांच्या रांगा, यादीत नाव नसल्याने हिरमोड; अनेकजण निराश होऊन घरी परतले
By नितीन चौधरी | Published: May 7, 2024 10:43 AM2024-05-07T10:43:28+5:302024-05-07T10:44:30+5:30
काही कुटुंबातील नावे मतदार यादीत असली तरी त्यातीलच काही सदस्यांची नावे वगळविण्यात आल्याने अशा मतदारांनी ही नाराजी व्यक्त केली.
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सकाळच्या टप्प्यात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या तर मतदार यादीत नाव सापडत असल्याने अनेक मतदार निराश होऊन घरी परतले. गेली अनेक वर्षे एकाच मतदान केंद्रांवर मतदान करणाऱ्या काहींनी नाव सापडत नसल्याने नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात ५.७७ टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रांवर निवडणूक शाखेतर्फे मतदारांची सोय करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील संघासाठी आज सकाळपासूनच मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. दुपारनंतर ऊन वाढण्याची शक्यता असल्याने अनेक मतदारांनी सकाळीच मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले. खडकवासला मतदारसंघ पुणे शहराला लागून असल्याने मतदारांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले. आनंद नगर मतदार केंद्रातील मतदार यादीमध्ये अनेकांची नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. याच परिसरात राहणारे प्रकाश क्षिरसागर हे अनेक वर्ष याच मतदान केंद्रावर मतदान करतात. मात्र, यंदा मतदानासाठी गेले असता त्यांना आपले नाव सापडले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही कुटुंबातील नावे मतदार यादीत असली तरी त्यातीलच काही सदस्यांची नावे वगळविण्यात आल्याने अशा मतदारांनी ही नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्र परिसरात मंडप उभारण्यात आले आहेत. पाण्याची सोय देखील करण्यात आली असून दिव्यांगांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र परिसरात राजकीय पक्षांनी मतदार चिठ्ठ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी उपस्थिती दिसून आली.
बारामती लोकसभा मतदारसंघात सात ते नऊ या पहिल्या टप्प्यातील मतदान ५.७७ % झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक ७.७५ टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तर खडकवासला मतदारसंघात पाच टक्के मतदान झाले आहे.