सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार! बारामतीमध्ये रंगू शकतो सामना, नणंद-भावजय नव्हे; अस्मितेची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 06:53 AM2024-02-18T06:53:41+5:302024-02-18T06:55:09+5:30
सुळेंचा अनुभव ठरू शकतो भारी
दुर्गेश मोरे
Supriya Sule ( Marathi News ) : पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा मुकाबला पाहायला मिळणार, अशी चर्चा सुरू झाली असून, ही लढाई केवळ दोघींची राहणार नाही तर पवार विरुद्ध पवार असा अस्मितेचा सामना रंगू शकतो. मात्र, सुप्रिया सुळे यांचा अनुभव आणि त्यांनी केलेली कामे बघता सामना एकतर्फी होण्याची चर्चा मतदारांमध्ये आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुळे यांनी मतदार संघात लक्ष केंद्रित करत भेटीगाठी सुरू केल्या. महिलांकडे अधिक लक्ष दिले. त्यासाठी त्यांनी हळदी-कुंकू समारंभ, अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या घरी जाऊन चर्चा केली. इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्या थोपटेंना घरी जाऊन भेटल्या.
भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना दिलेल्या अहवालात बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा उमेदवार असतील तरच खा. सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपकडून अजित पवारांवर दबावतंत्र वापरण्यात येत होते. अखेर सुनेत्रा यांनी गाठीभेटी घेणे सुरू केले.
बारामतीकर योग्य तो निर्णय घेतील : शरद पवार
शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी केलेल्या आरोपांचे चोख प्रत्युत्तर दिले. पण त्यांनीही निर्णय बारामतीकरांवर सोडून दिला आहे. बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्षे ओळखतात. त्यामुळे आम्हाला भावनात्मक आवाहनाची आवश्यकता नाही. बारामतीकर योग्य तो निर्णय घेतील, त्याची मला खात्री आहे, असे म्हटले.
वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर...
अजित पवार यांनी नुकतीच लोकांना भावनिक साद घातली आहे. परिवार सोडला तर सगळे कुटुंबीय विराेधात आहेत, वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रीय अध्यक्ष झालो असतो, पक्ष ताब्यात आला असता, पण तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटी जन्मलो ना, अशा शब्दात अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. अजित पवारच नव्हे तर सुनेत्रा पवार यां देखील गाठीभेटीदरम्यान, आतापर्यंत साथ दिली, तशीच पुढेही साथ राहू द्या, असे आवाहन करत आहेत.