पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:56 AM2018-09-20T01:56:50+5:302018-09-20T01:57:35+5:30
सव्वा लाखाचा फटका, चोरटे दुचाकीवरून फरार
सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथे दागिने पॉलीश करून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात चोरट्यांनी हातचलाखीने सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार घडला आहे. सव्वा लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगवी येथील रेश्मा गणेश फडतरे यांच्यासह सासू सुनीता फडतरे, नणंद पल्लवी कोंढाळकर या तिघीजणी घरी असताना दोन व्यक्ती घरी आल्या. एकाने, ‘तुमच्याकडील तांब्याची भांडी, तसेच सोन्या-चांदीचे दागिने पॉलीश करून देतो,’ असे म्हणून फिर्यादी यांना तांब्याची भांडी आणायला सांगून कलशाला पॉलीश करून माघारी दिला. त्यानंतर पुन्हा चांदीच्या वस्तू मागून पायातील पैंजण काढून दिले व तेही पॉलीश करून माघारी दिले. पुन्हा सोन्याचे दागिनेही पॉलीश करू म्हणून कानातील सोन्याचे रिंगा, फुले व टॉप्स, तसेच गळ्यातील गंठण काढून इसमाकडे दिले. या वेळी फिर्यादी यांना स्टीलचा डबा आणायला सांगून त्यांच्याकडील लिक्विड ओतून थोडे पाणी टाकून त्यात हळद टाकली. घरात असलेल्या तिन्ही महिलांच्या समोर पॉलीशसाठी घेतलेले सर्व सोन्याचे दागिने स्टीलच्या डब्यात टाकले व त्यातील एक जण तो डबा हातात घेऊन म्हणाला की, गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून, थोडा वेळ गरम करा म्हणत फिर्यादी महिलेच्या मागे किचनपर्यंत येऊन क्षणात हातचालाखी करून दागिने काढून घेतले व डबा महिलेच्या हातात दिला. पाणी गरम करून झाल्यावर डब्यातील दागिन्याला चकाकी आली का पाहण्यासाठी सांगितले असल्याने, पंधरा मिनिटांनी तिघीही स्टीलच्या डब्यातील दागिने पाहण्यासाठी गेले असता त्यात फक्त कानातील एक फूल आढळून आले. बाहेर त्यांना पाहण्यासाठी आले असता मात्र दोघेही अज्ञात चोर तेथून दुचाकीवरून पळून गेले होते.
अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे साखळीतील गळ्यातील सोन्याचे गंठण, ३० हजार रुपये किमतीचे कानातील १ तोळे वजनाचे सोन्याचे टॉप्स, १५ हजार रुपये किमतीच्या अर्धा तोळ्याचे कानातील सोन्याच्या रिंगा, १५ हजार रुपये किमतीच्या कानातील अर्धा तोळे वजनाची सोन्याची फुले असे एकूण १ लाख २० हजार रुपयांचे दागिने फसवणूक करून पळून नेले आहेत. याबाबत फिर्यादी रेश्मा गणेश फडतरे (वय २८, रा. सांगवी, ता. बारामती) यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.