लोणी काळभोरला ५४ हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 03:00 AM2016-03-18T03:00:38+5:302016-03-18T03:00:38+5:30
हॉलचा दरवाजा उघडा असल्याचा तसेच घरातील व्यक्ती कामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी तिजोरीतील जवळपास ५४ हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळे
लोणी काळभोर : हॉलचा दरवाजा उघडा असल्याचा तसेच घरातील व्यक्ती कामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी तिजोरीतील जवळपास ५४ हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना पाषाणकर बाग लोणी काळभोर येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडलीे. याप्रकरणी अंकुश राजाराम पाटील (मूळ रा. हलकरणी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, सध्या रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश पाटील हे नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता उठले. घरातील सर्व कामे झाल्यानंतर ५.३० वाजण्याच्या सुमारास ते घराचा दरवाजा उघडा ठेवून ते स्लॅबवर असलेल्या टाकीतील पाणी खाली सोडण्यासाठी वर गेले. त्यावेळी त्यांची पत्नी मनीषा स्वयंपाकघरात काम करत होत्या. पंधरा मिनिटांनी पाटील पुन्हा घरात आले, त्या वेळी त्यांना हॉलमध्ये असलेल्या तिजोरीचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी पत्नीस विचारले असता, तिने आपण हॉलमध्ये गेलो नसल्याचे सांगितले. पाटील यांना चोरीचा संशय आला. म्हणून त्यांनी तिजोरीची पाहणी केली असता त्यांना १८ हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे कानांतील टॉप्स व डूल, १८ हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे गंठण व १८ हजार रुपये किमतीचे सव्वा तोळे वजनाची गळ्यातील चेन असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा पावणेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दिसले नाहीत. त्यांनी या प्रकरणी चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)