लोणावळ्यात संततधार

By admin | Published: August 12, 2016 01:01 AM2016-08-12T01:01:38+5:302016-08-12T01:01:38+5:30

लोणावळा, खंडाळा या घाटमाथ्यावरील पर्यटनस्थळांसह मावळ तालुक्यात पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाढला आहे.

In Lonavala | लोणावळ्यात संततधार

लोणावळ्यात संततधार

Next

लोणावळा : लोणावळा, खंडाळा या घाटमाथ्यावरील पर्यटनस्थळांसह मावळ तालुक्यात पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून पुन्हा वाढला आहे.
काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने मावळातील पवना, वडिवळे, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, लोणावळा आदी सर्वच धरणे पूर्ण भरली आहेत. टाटा कंपनीच्या वलवण, शिरोता, सोमवडी, ठोकळवाडी या धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या हायड्रो व दरवाजांवाटे दुपारी १ वाजल्यापासून २७९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याने पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यात सरीवर पडत असणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासून वाढला आहे. पावसाची संततधार सुरू राहिल्यास व पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाकडून पुन्हा येणाऱ्या शनिवार, रविवार व सोमवारी लोणावळ्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोणावळा आणि खंडाळा परिसरात मागील दोन आठवड्यांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात या वर्षी ११ आॅगस्ट अखेरपर्यंत ३२५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या कालावधीपर्यंत
२५१५ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी वर्षाअखेर
३३४९ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीची सरासरी ओलांडायला केवळ ९८ मिमी पावसाची गरज आहे.(वार्ताहर)

Web Title: In Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.