सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा हाऊसफुल, पर्यटकांची गर्दी; अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 05:49 PM2024-06-15T17:49:16+5:302024-06-15T17:50:56+5:30

बहुतांश हॉटेल्स व खासगी बंगलोज यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा वाहनांसाठी खुला ठेवण्यासाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्यावतीने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे....

Lonavala is housefull, crowded with tourists due to three consecutive holidays; Additional police force appointed | सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा हाऊसफुल, पर्यटकांची गर्दी; अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त

सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा हाऊसफुल, पर्यटकांची गर्दी; अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त

लोणावळा : पावसाळी पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या घाटमाथ्यावरील लोणावळा शहरामध्ये अद्याप समाधानकारक पावसाला सुरुवात झाली नसली तरी शनिवार व रविवारला जोडून सोमवारी बकरी ईदची सुटी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. यामुळे सर्वत्र पर्यटकांची गर्दी झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बहुतांश हॉटेल्स व खासगी बंगलोज यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा वाहनांसाठी खुला ठेवण्यासाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्यावतीने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. बाजार भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पूल भांगरवाडी दरम्यान ‘वन वे’ करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक व लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी या सर्व बंदोबस्त नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी करत येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वाहतुकीचे नियोजन कशा पद्धतीने करावे याचा आढावा घेतला.

शहरामधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेल्या भुशी धरणामध्ये अद्याप पाणीसाठा झाला नसला तरी अनेक पर्यटक धरण परिसरामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. लायन्स पॉइंट, खंडाळा, राजमाची पॉइंट, खंडाळा तलाव, तुंगार्ली धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तीन दिवस सलग सुट्या आल्याने अनेक पर्यटक मुक्कामी राहण्यासाठी लोणावळ्यात आले आहेत. त्यांच्या आगाऊ बुकिंगमुळे बहुतांश सर्वच हॉटेल्स व खासगी बंगलोज हाऊसफुल झाले आहेत. शहराप्रमाणेच जवळच असलेल्या कार्ला लेणी व भाजे लेणी परिसरातदेखील गर्दी वाढली आहे. मळवली सदापूर, वाकसई या भागातील खासगी बंगलेदेखील गर्दीमुळे फुल झाले आहेत. कार्ला फाटा, मळवली, भाजे लेणी या परिसरामध्ये ग्रामीण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Lonavala is housefull, crowded with tourists due to three consecutive holidays; Additional police force appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.