लोणावळा ते पुणे : खासगी वाहनांना साथ, लोकलकडे प्रवाशांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:57 AM2019-03-20T01:57:25+5:302019-03-20T01:59:35+5:30
मागील काही वर्षांत लोणावळा ते पुणे या पट्ट्यामध्ये उद्योगधंदे, शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढल्यामुळे लोकवस्तीतही मोठी वाढ झाली आहे. पण दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेच्या लोकल सेवेला मात्र तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
- राजानंद मोरे
पुणे - मागील काही वर्षांत लोणावळा ते पुणे या पट्ट्यामध्ये उद्योगधंदे, शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढल्यामुळे लोकवस्तीतही मोठी वाढ झाली आहे. पण दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेच्या लोकल सेवेला मात्र तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मागील पाच वर्षांच्या तुलनेत प्रवासी संख्येत फारसा फरक पडलेला नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१४-१५ मध्ये शिवाजीनगर ते लोणावळा लोकलची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे ९५०० हजार एवढी होती. यावर्षी फेब्रुवारीअखेरपर्यंत ही सरासरी तेवढीच आहे. प्रवाशांच्या मागणीच्या तुलनेत लोकलची संख्या, दौंड, सातारा मार्गावरून येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि लोकलच्या वेळेतील तफावत, त्यामुळे इतर वाहनांचा वाढता वापर, विविध कारणांसाठी फेºया रद्द होणे अशा बाबींमुळे लोकलचा स्वस्त आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना आकर्षित करू शकलेला नाही.
पुणे ते लोणावळा लोकल सेवेला मागील आठवड्यात ४१ वर्षे पूर्ण झाली. ही सेवा सुरू झाली तेव्हा सकाळी व संध्याकाळी केवळ चार फेºया होत होत्या. त्यानंतर हळूहळू या मार्गावरील फेºया वाढत गेल्या. सध्या या मार्गावर दिवसभरात ४४ फेºया होतात. पुणे व लोणावळासह एकूण १८ स्थानके आहेत. पुर्वी तुलनेने पिंपरी चिंचवडच्या पुढे प्रवाशांची फारशी ये-जा होत नसे. थेट कामशेत, लोणावळ््याला जाणाºया प्रवाशांचे प्रमाण अधिक होते. पण कालांतराने पिंपरी चिंचवड परिसराचा विकास झपाट्याने होत गेला. हिंजवडीमध्ये आयटी पार्क, एक्सप्रेस वेमुळे परिसरातील बहुतेक गावांमधील जागांना मागणी वाढली. इतर उद्योगधंदे, व्यवसाय वाढीस लागले. अनेक शैक्षणिक संस्थांची संकुले उभी राहिली. परिणामी लोकवस्ती वाढली.
लोकल मार्गावर शिवाजीनगर पासून ते पिंपरी चिंचवडपर्यंत आधीपासूनच गर्दी होती. पण मागील १५-२० वर्षात आकुर्डी, देहुरोड, तळेगाव, वडगावच्या पुढे लोणावळ््यापर्यंत हे प्रमाण वाढले. त्यामध्ये दौंड व सातारा मार्गावरील रेल्वेप्रवाशांचीही जोड मिळत गेली. पण या प्रवाशांना गरजेनुसार व वेळेत लोकल सेवा न मिळाल्याने ही वाढ जणू खुंटत चालल्याची स्थिती आहे.
वेळा जुळत नाहीत : दोन लोकलमध्ये एक तासाचे अंतर
लोकलचे वेळापत्रक पाहिल्यास प्रत्येक फेरीमध्ये साधारणपणे एक तासाचे अंतर आहे. पुण्यातून सकाळी ६ ते १० या चार तासांत केवळ पाच लोकल आहेत.
प्रामुख्याने या वेळेतच विद्यार्थी, नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर प्रवास करतो. त्याचप्रमाणे दुपारी १२ ते ५ यावेळेतही पाचच लोकल आहेत.
त्यामुळे स्थानिक प्रवासी तसेच बाहेरगावाहून येणाºया गाड्यांच्या वेळा आणि लोकलच्या वेळा जुळत नाहीत. परिणामी, लोकलकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
आकडेवारी काय सांगते
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१४-१५ मध्ये दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या ९५ हजार होते. ही संख्या पुढील दोन वर्ष ९९ हजाराच्या जवळपास राहिली. त्यापुढील वर्षी म्हणजे २०१७-१८ मध्ये पुन्हा प्रवाशांमध्ये पाच हजाराने घट झाल्याचे दिसते. तर चालु वर्षामध्ये फेब्रुवारीअखेरपर्यंत हा आकडा ९५ हजारांपर्यंत पोहचला आहे. मात्र, लोणावळा ते पुणेदरम्यान वाढलेल्या लोकवस्तीच्या तुलनेत प्रवासी संख्येत वाढ झालेली नाही.
प्रशासन म्हणते...
शिवाजीनगर स्थानकात नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या तिसºया लाईनचे काम पुर्ण झाल्यानंतर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल. सध्या ये-जा करण्यासाठी केवळ एक-एकच लाईन असल्याने लोकल फेºया वाढविता येत नाही. लांबपल्याच्या एक्सप्रेस, इंटरसिटी गाड्यांना प्राधान्य द्यावे लागते. या गाड्यांच्या मधल्या वेळेत लोकल धावते. त्यामुळे फेºया वाढविता येत नाहीत.
दौंड मार्गावरून पुण्यात येत पुढे लोणावळा लोकलने जाणार ेअनेक प्रवासी आहेत. मात्र, वेळेत लोकल नसल्याने तसेच ब्लॉक व इतर कारणांमुळे सतत फेºया रद्द होत असल्याने अनेकदा प्रवाशांना बस किंवा इतर पर्यायांचा विचार करावा लागतो. दौंड-पुणे दरम्यान दररोज सुमारे १५ ते १६ हजार प्रवासी प्रवास करतात. या मार्गावरही लोकल झाल्यास दौंड ते लोणावळा अनेक प्रवाशांना फायदा होईल.
- विकास देशपांडे, सचिव, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ
लोणावळा लोकलच्या फेºया वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. पण रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो. फेºया न वाढल्यामुळे प्रवाशांना वेळेप्रमाणे लोकल मिळत नाही. त्यामुळे प्रवासी इतर साधनांचा वापर करतात.
- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप