Lonavala Rain: लोणावळा शहरात विक्रमी पाऊस; 24 तासात तब्बल 273 मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:25 AM2023-07-20T09:25:52+5:302023-07-20T09:26:24+5:30

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे....

Lonavala Rain: Record rainfall in Lonavala city; As much as 273 mm of rain was recorded in 24 hours | Lonavala Rain: लोणावळा शहरात विक्रमी पाऊस; 24 तासात तब्बल 273 मिमी पावसाची नोंद 

Lonavala Rain: लोणावळा शहरात विक्रमी पाऊस; 24 तासात तब्बल 273 मिमी पावसाची नोंद 

googlenewsNext

लोणावळा( पुणे) : घाटमाथ्यावरील पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहरात बुधवारी (19 जुलै) 24 तासात 273 मिमी (10.75 इंच) इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या हंगामात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील तीन दिवसात शहरात तब्बल 705 मिमी पाऊस झाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लोणावळा शहरात जुन महिन्यांपासून आजपर्यंत 2017 मिमी (79.41 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 2 हजार 622 मिमी (103.23 इंच) पाऊस झाला होता. सोमवारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील काही रस्त्यावर पाणी साचू लागले आहे. मावळा पुतळा चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दुकानांच्या जोत्याला पाणी लागले आहे. शहानी रोड, बस स्थानकाच्या बाहेरील रस्ता, बाजारातील रस्ते, रायवुड भागातील रस्ते, नांगरगाव वलवण रस्त्यावर पाणी साचले आहे.

आर्दश काॅलनी नांगरगाव समोरील मुख्य रस्ता कालपासून पाण्याखाली गेला असून सोसायटीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे सातु हाॅटेलसमोर पाण्याची मोरी बंद केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे तसेच खंडाळ्यातील पोस्ट कार्यालयाच्या मागील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सकल भागातील देखील पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच जोरदार हवेमुळे झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडत असल्याने मोठ्या झाडांखाली थांबणे टाळावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Lonavala Rain: Record rainfall in Lonavala city; As much as 273 mm of rain was recorded in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.