लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ‘थ्री स्टार’ मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:58 PM2020-05-20T12:58:30+5:302020-05-20T12:58:55+5:30
लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग 2 वर्षे राखला 'थ्री स्टार' मानांकनाचा दर्जा
लोणावळा : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन प्राप्त झाले आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 1435 शहरांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी फक्त 141 शहरांना नामांकन प्राप्त झाले आहे.
देशभरातील 6 शहरांना फाईव्ह स्टार मानांकन, 64 शहरांना थ्री स्टार मानांकन व 71 शहरांना वन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. या 64 शहरातून महाराष्ट्रामधील फक्त 34 शहरांनी 3 स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.
लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग 2 वर्षे थ्री स्टार मानांकनाचा दर्जा राखला आहे. लोणावळा शहरात मागील चार वर्षापासून स्वच्छतेची ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. शहरातील सर्व परिसरात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे, कचरा विलर्गीकरण, संपुर्ण शहर कचराकुंडीमुक्त केल्याने आज कोरोना सारख्या महामारीच्या काळात लोणावळा शहर कोरोना व संसर्गरोगमुक्त राहिले आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह आरोग्य विभागाच्या सर्व आजी माजी सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी वर्ग, स्वच्छता विभागातील सर्व स्वच्छता दूत, शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दैनिक पत्रकार संघ, स्थानिक साप्ताहिक, सर्व असोसिएशन, व्यावसायिक व लोणावळा शहरातील नागरिक या सर्वांच्या सहकार्याने लोणावळा शहराचा डंका सलग तिसर्या वर्षी देशात वाजला आहे. भविष्यात देखिल स्पर्धा असो वा नसो लोणावळा शहराला कायम स्वच्छ कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प लोणावळा नगरपरिषदेने केला आहे. शहराला रोगमुक्त ठेवण्याकरिता स्वच्छता महत्वाची आल्याने नागरिकांनी देखिल घरात, दुकानात, अस्थापनांमध्ये निर्माण होणारा कचरा घंटागाडीतच विलर्गीकरण करून टाकावा व नगरपरिषद आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.