लोणावळा लोकल पाठोपाठ दौंड डेमु सेवेलाही हिरवा कंदील; दोन-तीन दिवसांत धावणार 'ट्रॅक'वर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 06:09 PM2020-10-17T18:09:02+5:302020-10-17T18:17:16+5:30
ई-पास आवश्यक : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश
पुणे : लोणावळा लोकल पाठोपाठ पोलिस प्रशासनाने पुणे-दौंड दरम्यान डेमु सेवेलाही हिरवा कंदील दाखविला आहे. ही सेवा पुढील दोन-तीन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक असून तो दाखविल्यानंतरच तिकीट दिले जाणार आहे.
अनलॉकमध्ये टप्प्याटप्याने रेल्वे सेवा सुरू केली जात आहे. पुण्यातील उपनगरीसह सेवा सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्तांवर समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आठवडाभरापासून पुणे-लोणावळा लोकल सुरू करण्यात आली आहे. लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी पोलिसांकडून ई-पास दिला जात असून हा पास दाखविल्यानंतरच स्थानकांवर तिकीट दिले जात आहे. लोकल सुरू झाल्यानंतर दौंड डेमु सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती.
आमदार राहुल कुल यांच्यासह दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना भेटून डेमु सुरू करण्याची विनंती केली होती. अखेर आयुक्तांनी ही मागणी मान्य करत डेमु सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. लोणावळा लोकलप्रमाणेच डेमुमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करू शकतात, असे संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी सांगितले.
--------------
सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी पुणे ते दौंडदरम्यान डेमु गाडी सकाळी व सायंकाळी सोडण्यात येते. याच गाडीचा वापर या प्रवाशांसाठीच खुला केला जाणार आहे. सध्या गाडीचे चार डबे बंद असतात. या चार डब्ब्यांमध्ये ई-पास असलेल्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. ही गाडी दौंडमधून सकाळी ७.४५ वाजता व पुण्यातून रात्री ७.३० वाजता सुटते.
--------------
सर्वसामान्य प्रवाशांनाही गाड्यांमध्ये प्रवेश द्यायला हवा. या प्रवाशांचे हाल होत असून सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. लोकललाही गर्दी नाही. इतर कर्मचाऱ्यांनाही प्रवेश दिल्यास त्यांची गैरसोय थांबेल.
- हर्षा शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी ग्रुप
---------------