लोणावळा नगरपरिषद बनावट ना हारकत व नोटीस प्रकरण : नागरिकांना ना हारकत दाखले व नोटीसा पडताळून घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 12:00 AM2017-12-14T00:00:26+5:302017-12-14T00:00:40+5:30
लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकार्यांच्या बनावट सह्या करत काही बांधकामांना ना हारकत दाखले तर काहींना अतिक्रमण नोटीसा दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकार्यांच्या बनावट सह्या करत काही बांधकामांना ना हारकत दाखले तर काहींना अतिक्रमण नोटीसा दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभुमीवर लोणावळा शहरातील मागील वर्षभराच्या कालखंडात ज्या नागरिकांना ना हारकत दाखले तसेच नोटीसा मिळाल्या असतील त्या नगरपरिषदेच्या अधिकृत आहेत का याची पडताळणी संबंधितांनी नगरपरिषद कार्यालयात येऊन करुन घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.
लोणावळा नगरपरिषदेला मागील काही काळांपासून दलांलाची किड लागली आहे. नगरपरिषदेचे सदस्य असल्याचे भासवत अनेक बांधकाम व्यावसायकांना धमकावत त्यांच्याकडून पैसे उकले गेल्याच्या चर्चा शहरात आहे, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखिल हा मुद्दा काही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला होता. तदनंतरच्या काळात चक्क नगरपरिषदेचे लेटरहेड चोरत त्यावर अधिकार्यांच्या सह्या करुन काही बांधकामांना अतिक्रमण नोटीसा देऊन तर काही बांधकामांना ना हारकत दाखले देऊन पैसे उकळले जात असल्याचा प्रकार उघड झाल्याने लोणावळापोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर शहरातील नागरिकांनी त्यांना देण्यात आलेले परवाने व नोटीसा ह्या अधिकृत आहेत का याची पडताळणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नगरपरिषदेच्या व लोकप्रतिनिधींच्या नावे कोणी धमकावत असल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
त्या व्हिलाधारकावर होणार कारवाई
लोणावळा नगरपरिषदेचा ना हारकत दाखला पैसे देऊन मिळविल्याप्रकरणी लोढा गिलक्रिस्टमधील प्रफुल्ल राणावत यांच्यावर देखिल कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले तसेच त्या सोसायटीमधील इतर व्हिला धारकाचे परवाने तपासण्यात येणार आहेत