लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला; 24 तासात १८० मिमी पावसाची नोंद
By admin | Published: June 27, 2017 11:10 AM2017-06-27T11:10:00+5:302017-06-27T11:10:00+5:30
सोमवारी दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने लोणावळ्यात 24 तासात १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 27 - शनिवारी जोरदार हजेरी लावत विसावलेल्या वरुण राजाने सोमवारी दुपारनंतर पुन्हा जोरदार वर्षाव केल्याने 24 तासात १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षातला हा सर्वांधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून रिमझिम पडणार्या पावसाने शनिवारपासून चांगलाच जोर धरला आहे. शनिवारी 24 तासात १५० मिमी पाऊस झाल्यानंतर रविवार व सोमवारी दुपारपर्यत पावसाने विश्रांती घेत दुपारी ३ नंतर पुन्हा जोरदार सरी सुरु झाल्या, रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने सरासरी 24 तासात १८० पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरास सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओढे नाले दुथडी भरुन वाहत असून सकल भागात तसेच अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचले आहे. लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने यावर्षी नालेसफाई तसेच इंद्रायणी नदी सफाईची कामे योग्य प्रकारे न झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार झाले आहेत. ग्रामीण भागात विशेषतः महामार्गाच्या लगत बांधकाम व्यावसायीक व स्थानिक यांनी बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात भराव केल्याने पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बाधित झाले आहेत. यामुळे रस्त्या लगतची भात शेती व परिसरात सर्वदूर पाणी पसरले आहे.