लोणावळ्यात मुसळधार पाऊस, पर्यटकांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 09:56 AM2019-07-28T09:56:43+5:302019-07-28T09:56:53+5:30

सलग 48 तास लोणावळ्यात जोरदार कोसळल्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

Lonavla receives 633 mm of rainfall in 48 hours | लोणावळ्यात मुसळधार पाऊस, पर्यटकांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोणावळ्यात मुसळधार पाऊस, पर्यटकांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Next

लोणावळा : सलग 48 तास लोणावळ्यात जोरदार कोसळल्यानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. शुक्रवार सकाळ ते रविवार सकाळ ह्या 48 तासांत लोणावळा शहरात तब्बल 633 मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने लोणावळा शहर व ग्रामीण परिसर जलमय झाला होता. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुराचे पाणी कार्ला, मळवली, बोरज भागातील सोसायट्यांमध्ये घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

मळवली येथील संपर्क संस्थेत पाणी शिरले होते तर देवले येथील ओशो आश्रमात पाण्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांना लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग या रेस्क्यू पथकाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप बाहेर काढले. भुशी धरणाच्या पायर्‍यांवरून वेगाने पाणी वाहत असल्याने शनिवारी दिवसभर धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. लोणावळा ते आयएनएस शिवाजीकडे जाणारा रस्ता क‍ाही ठिकाणी प‍ाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीकरिता बंद ठेवला होता. शहरातील वलवण गावातून जाणारा रस्ता, बापदेव रोड, नांगरगाव रोड, कुसगाव पवनानगर रस्ता, कार्ला लेणीकडे जाणारा रस्ता, मळवलीकडे जाणारा रस्ता, रायवुड येथील रस्ता, नारायणीधाम कडे जाणारा मार्ग हे बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्याने लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

नालेसफाई योग्य प्रकारे न झाल्याने तसेच पाण्याचे प्रवाह काही ठिकाणी आडविले गेल्याने नांगरगाव भागात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, पोलीस निरीक्षक दीपक लुकडे व त्यांची टीम हे सर्वजण दिवसभर शहरात गस्त घालत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पावसाचा जोर कमी होत नसल्याने लोणावळाकरांच्या मनात धाकधूक होती, मात्र शनिवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी वाहून जाण्यास मोठी मदत झाली. पाण्याखाली गेलेले रस्ते दिसू लागले असून सोसायट्यांमध्ये शिरलेले पाणी ओसरु लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी वारा वेगात वाहू लागला आहे.

Web Title: Lonavla receives 633 mm of rainfall in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.