Bhagat Singh Koshyari: जोपर्यंत भारत देश आहे, तोपर्यंत रामाचे अस्तित्व टिकून राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:53 PM2021-12-26T12:53:43+5:302021-12-26T13:00:52+5:30
रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल
पुणे : “रामायण, महाभारत या पुराणकथा नाहीत. त्यात समाजजीवनाचे चित्रण आहे. प्रभू श्रीराम हे केवळ एका धर्म किंवा संप्रदायापुरते मर्यादित नाहीत. प्रभू श्रीरामांचे जीवन युगानयुगे देशाच्या प्रेरणेचा स्रोत आहे. जोपर्यंत भारत देश राहील, तोपर्यंत रामाचे अस्तित्व राहील. रामाला जितके हृद्यात ठेवाल तितके जीवनात चैतन्य व स्फूर्ती मिळेल. पुढील शंभर वर्षे गीतरामायण घरोघरी ऐकले जाईल,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
शिक्षण प्रसारक मंडळी व अमृतसंचय प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररुप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते.
या ग्रंथाच्या ब्रेल लिपीतील रूपांतरित ग्रंथाचे देखील प्रकाशन यावेळी झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ग. दि. माडगूळकरांचे पुत्र आनंद माडगूळकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अँड. सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष अँड. एस. के. जैन, अमृतसंचय प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दत्तात्रय तापकीर, सचिव नरेंद्र उंब्रजकर आदी यावेळी उपस्थित होते.
कोश्यारी म्हणाले, “ रामायण, महाभारत, भगवद्गीता हे केवळ धर्मग्रंथ नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावेत असे राजमार्ग आहेत. प्रभू श्रीराम हा विषय अनंत असल्याने त्यावर विविध पद्धतीने व्यक्त होत राहण्याची प्रक्रिया चिरंतन सुरूच राहील.” डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सध्या ज्या काही गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टींना चाप बसेल, असे नैतिकतेचे धडे गीत रामायणात आहेत.
आनंद माडगूळकर यांनी केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या गीत रामायणाच्या आवृत्तीमध्ये शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका असल्याची खंत व्यक्त केली. त्या चुका सुधारुन ते शुद्ध रूपात प्रकाशित व्हावे. पुणे विद्यापीठात गदिमा आणि बाबुजींच्या नावाने अध्यासन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.