वीर जवान अमर रहे...! शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By श्रीकिशन काळे | Published: September 5, 2023 04:27 PM2023-09-05T16:27:35+5:302023-09-05T16:27:43+5:30
जवान दिलीप ओझरकर वर्षातून एकदा दहीहंडी व गणेशोत्सवाला आवर्जून पुण्यात येत होते
पुणे: ‘वीर जवान अमर रहे...’चा जयघोष करत शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. अनेक नागरिक अंत्यसंस्काराच्या वेळी आले होते. सर्वांनी साश्रूनयनांनी वीर जवानाला आदरांजली वाहिली.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. शहीद दिलीप ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, सुनिल कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडिअर राजेश गायकवाड (नि.), उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे(नि.), लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
कारगिल येथे देशसेवा बजावत असताना ३ सप्टेंबर रोजी दिलीप ओझरकर शहीद झाले. ते अवघ्या ३८ वर्षाचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, ६ वर्षाचा मुलगा, ४ वर्षाची मुलगी व दोन भाऊ आहेत. ते वर्षातून एकदा दहीहंडी व गणेशोत्सवाला आवर्जून येत होते. नुकतेच त्यांनी आपल्या मुलांना व्हिडिओ कॉल केला होता. तेव्हा त्यांचे बोलणे झाले होते.
ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर हे मावळ येथे ओझरडी गावात शेती करतात. ते सध्या भवानी पेठेत राहायला होते. ही घटना समजल्यानंतर सर्व भवानी पेठेमध्ये शोककळा पसरली होती. बाळासाहेब ओझरकर यांनी खूप हाल अपेष्टा सोसून त्यांनी मुलाला सैन्यात भरती केले होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबीयांवर मोठा डोंगर कोसळला आहे.