यमाई शिवरीत पालखी स्वागतासाठी लगबग
By admin | Published: June 10, 2017 01:51 AM2017-06-10T01:51:18+5:302017-06-10T01:51:18+5:30
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत सोपानकाकांच्या सासवड नगरीतील मुक्काम आटोपून मल्हार मार्तंड खंडोबाच्या जेजुरी नगरीकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
खळद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत सोपानकाकांच्या सासवड नगरीतील मुक्काम आटोपून मल्हार मार्तंड खंडोबाच्या जेजुरी नगरीकडे जात असताना दुपारच्या विसाव्यासाठी आदिमाया, आदिशक्ती यमाईदेवीच्या शिवरी येथे थांबते. यानिमित्ताने येथील ग्रामपंचायतीची तयारीची लगबग सुरू आहे.
येथे भव्य असा विसावामंडप असून कोट्यवधी रुपये खर्च करीत मंदिर परिसराचे नूतनीकरण सुरू आहे. आता समोरील दर्शनीभागाचे काम प्रगतिपथावर आहे.
आळंदीहून पालखी निघाल्यानंतर येथे पहिल्यांदा माऊलींच्या पालखीतून बाहेर काढीत यमाई देवीच्या भेटीला नेतात व अलौकिक भेटसोहळा येथे होतो. तो पाहण्यासाठी व पालखीच्या दर्शनासाठी वैष्णवांच्या मेळ्याबरोबरच शिवरी, खळद, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज, निळुंज, भाटमळवाडी, शिंदेवाडीसह परिसरातील हजारो भाविक येतात.
यानिमित्ताने विसावा संपूर्ण परिसर साफ-सफाई, मुरूम टाकणे व हवारी करणे, जमिनीचे सपाटीकरण करणे, संपूर्ण ओला-सुका कचरा उचलणे, दोन दिवस अगोदर धूर फवारणी करणे, फोलीडोन पावडर धुरळणी करणे. हीच प्रक्रिया पालखी गेल्यानंतर करणे. विसावा मंडप धुणे, निर्जंतूक करणे, सार्वजनिक शौचालय साफ करणे व पाण्याची व्यवस्था करणे, पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करणे, पाण्याच्या टाक्या धुणे व शुद्धीकरण करणे, मेडिक्लोर वाटप करणे, पालखी विसावा सभामंडप सजावट करणे, दर्शनबारी महिला व पुरूष स्वतंत्र व्यवस्था करणे, साऊंड सिस्टिमची व्यवस्था करणे, श्री माऊली व श्री यमाईमाता यांच्यासाठी पूजा-अर्चा व हार-फुले यांची व्यवस्था करणे, आळंदी देवस्थान समिती व दिंडी यांचा मान-सन्मान करणे, पालखी गेल्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करणे व निर्जंतुक करणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे सरपंच कोमल लिंभोरे, ग्रामसेवक विठ्ठल रावते यांनी सांगितले.