विडंबन काव्याला दीर्घ परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:57+5:302021-05-21T04:09:57+5:30
रामदास फुटाणे : बंडा जोशी यांना रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे कार्यगौरव पुरस्कार पुणेः विडंबन काव्याला प्र. के. अत्रे आणि चिं. ...
रामदास फुटाणे : बंडा जोशी यांना रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे कार्यगौरव पुरस्कार
पुणेः विडंबन काव्याला प्र. के. अत्रे आणि चिं. वि. जोशी यांच्या रूपाने दीर्घ परंपरा लाभली आहे. विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारला जातो. परंतु ते चुकीचे असून जीवन-मृत्यूच्या प्रवासात विनोदच आनंद पेरत असतो. त्यामुळे विनोदाला पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठ वात्रटीकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी यांना रामदास फुटाणे यांच्या निवासस्थानी फुटाणे यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात प्रदान करण्यात आला, त्यावेळी फुटाणे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, गाैरव रामदास फुटाणे उपस्थित होते.
बंडा जोशी म्हणाले, बालपणी माझा मामा श्रीपाद जोशी, तर कॉलेजमध्ये प्रा. पुरुषोत्तम शेठ व द. के. बर्वे यांच्यामुळे माझ्या साहित्य-कलागुणांची जडण-घडण झाली. नोकरीमध्ये किर्लोस्करवाडी आणि नंतर पुणे आकाशवाणीत आणि शहरात अनेक प्रतिभावंतांच्या सहवासात या गुणांचा विकास झाला. देशविदेशात माझ्या लेखन आणि कलेला रसिकांनी उदंड दाद दिली. यामध्ये माझ्या कुटुंबाइतकाच रंगत-संगत परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे घरच्या माणसांनी केलेले कौतुक आहे. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अनमोल आहे.''
अॅड.प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. गाैरव रामदास फुटाणे यांनी आभार मानले.
छायाचित्र ओळीः-
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी यांना प्रदान करताना रामदास फुटाणे. यावेळी (डावीकडून) अॅड.प्रमोद आडकर, जोशी, फुटाणे आणि प्रा. मिलिंद जोशी.