लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर दलात समाविष्ट : अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 06:38 PM2020-10-26T18:38:29+5:302020-10-26T18:45:05+5:30
लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांबरोबरच हवेली पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात यावे, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मागणी होती..
पुणे : वाढत्या नागरिकीकरणामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलातील नागरीकरण झालेला भाग शहर पोलीस दलाकडे सोपविण्याची गेल्या काही वर्षांपासूनची मागणी राज्य शासनाने सोमवारी( (दि.२६) पूर्ण केली आहे. लोणी काळभोर आणि लोणीकंद पोलीस ठाणी आज शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात आले आहे. तशी अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आवश्यक कर्मचारी व गुन्ह्यांचे आदान-प्रदान प्रक्रिया येत्या २ ते ४ दिवसात पूर्ण करुन १ नोव्हेंबरपासून ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलात समाविष्ट होणार आहे. येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च पुणे शहर पोलीस दलातून होणार आहेत. लोणीकंद पोलीस ठाणे परिमंडळ ४ व सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभागाला आणि लोणीकाळभोर पोलीस ठाणे परिमंडळ ४ सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभागाला जोडण्यात आले आहे. त्यामुळे परिमंडळ ४ व ५ च्या अंतर्गत ७ पोलीस ठाणे व येरवडा व वानवडी सहायक आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत ४ पोलीस येणार आहेत.
लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांबरोबरच हवेली पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात यावे, अशी गेल्या काही वर्षांपासूनची मागणी होती. गृह विभागात काम करणारे अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर यासंबंधीचे सर्व प्रस्ताव तपासले़ व त्याचा पाठपुरावा केला. त्यातूनच एका महिन्याच्या आत हे दोन्ही पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, याबरोबरच हवेली पोलीस ठाण्याचाही समावेश शहर पोलीस ठाण्यात करण्यात यावा, अशी मागणी होती. मात्र, त्याचा प्रस्ताव स्वतंत्रपणे पाठविला गेला असल्याने ती मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. हवेली पोलीस ठाणे तसेच पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सीमेरेषेवरील पोलीस ठाण्यांच्या सीमांची फेररचना करण्याची आवश्यकता आहे.
़़़़़़़़़़
राज्य शासनाने अभिसूचना काढली आहे़ त्यादृष्टीने पोलीस अधिकारी, कर्मचारी, कागदपत्रांची देवाणघेवाण अन्य बाबींची पुर्तता येत्या २ ते ४ दिवसात करण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून संपूर्णपणे ही दोन्ही पोलीस ठाणी शहर पोलीस दलातून कार्यरत होतील.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर