लोणी काळभोर ग्रामीण पोलीस स्टेशन शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:54+5:302021-03-24T04:10:54+5:30
उरुळी कांचन व वाघोली ही दोन नवीन पोलीस स्टेशन निर्माण करून ती ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांच्या अखत्यारीत कार्यरत ...
उरुळी कांचन व वाघोली ही दोन नवीन पोलीस स्टेशन निर्माण करून ती ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांच्या अखत्यारीत कार्यरत ठेवण्याची घोषणा शासनाने केली होती व ती अस्तित्वात येणार येणार करत असतानाच अचानक या भागात सध्या कार्यरत असलेली लोणी काळभोर व लोणी कंद ही पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस मुख्यालयात आहे. त्या कार्यक्षेत्रासह हस्तांतरित करण्याच्या आदेशाने या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांच्या व पुढाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना निर्माण झाली आहे! परिसरात नाराजी पसरली आहे.
या पोलीस ठाण्याच्या कारभाराचा समारोप पोलीस ठाण्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून शहर पोलीस आयुक्तालयात हस्तांतरणाने होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात अनेक दशके लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा अनेक अंगाने जिल्हाला नव्हे तर राज्याला परिचय झाला आहे. पूर्वी हे पोलीस ठाणे पुणे शहरालगतच्या फुरसुंगी, देवाची उरुळी, वडकी, मांजरी बुद्रुक, वाघोली, लोणी कंद अशा स्वरुपात संपूर्ण पूर्व हवेली तालुका अशा हद्दीत समाविष्ट होते या काळात क्राईमसह अवैध धंदे, गुन्हेगारी कार्यक्षेत्र म्हणून ते सतत केंद्रस्थानी राहिले आहे. या ठिकाणी सधनता व सुबत्ता असल्याने अनेक अधिकाऱ्यांची या पोलिस ठाण्याला वर्णी लागण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्याचे जिल्ह्याने अनुभवले आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस पटलावर कायम चर्चेत राहिलेल्या या पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन काही भाग पुणे शहर पोलीस आयुक्तालयात व काही ग्रामीण पोलिसात राहण्याने जुन्या आठवणींना उजाळा येणार होता. मात्र लोणी काळभोर पोलीस ठाण्याला मनुष्यबळासह व कार्यक्षेत्रासह पुणे शहर पोलीस हद्दीत समाविष्ट करण्यास शासन मान्यता मिळाल्याने त्या कायमच्या मिटणार आहेत.
पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बैठक घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार १६ मार्च रोजी गृह विभागाने आदेश काढून लोणी काळभोर व लोणी कंद ही पोलीस ठाणी समावेशाला मान्यता दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह अन्य ५ अधिकारी व ६० कर्मचाऱ्यांच्या बदल्या ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रात झाल्या आहेत.
गृह विभागाच्या आदेशात लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पुणे शहर पोलीस मुख्यालयात समाविष्ट करण्याच्या आदेशात हद्दीची रचना अथवा आस्थापना यांची रचना अद्याप स्पष्ट झाली नसली तरी समावेश निश्चित झाल्याने ग्रामीण पोलिस दलातील लोणी काळभोरचा उल्लेख आता राहणार नाही.