लोणी काळभोरची यात्रा यंदा सुनीसुनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:22+5:302021-04-29T04:07:22+5:30
-- लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील सर्वांत मोठी व नावाजलेली लोणी काळभोर गावची वार्षिक यात्रा यंदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ...
--
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील सर्वांत मोठी व नावाजलेली लोणी काळभोर गावची वार्षिक यात्रा यंदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अतिशय शांत व नीरस वातावरणात पार पडली. चैत्र नवरात्रातील नऊ दिवस मंदिराला कुलूप लावण्यात आले होते, त्यामुळे भाविक-भक्तांच्या अनुपस्थितीत फक्त पुजारी, मानकरी अशा मोजक्या लोकांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले.
लोणी काळभोर (ता. हवेली) हे पूर्व हवेलीतील आर्थिकदृष्ट्या संपन्न गाव आहे. त्यामुळे येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा अपूर्व उत्साहात साजरी करण्यात येते. येथील कुस्त्यांचा आखाडाही प्रेक्षणीय असतो. विजेत्या मल्लांना एकूण पंचवीस लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातात. त्यामुळे या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोना मारामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले.
येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुढीपाडव्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होते.
पुढील पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेला ( हनुमान जयंती ) असते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींना महामस्तकाभिषेक करण्यात येतो. अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडतो, चैत्र नवरात्रातील घटस्थापना होते, सुवासिनींनी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होतो. सातव्या माळेच्या दिवशी सायंकाळी सात वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापूजा पहाटे चार वाजता होते. पालखी सोहळा झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरू होतो.
दहाव्या दिवशी पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो. यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात येतो. २००१ चे महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर यांचे गाव असल्याने येथील कुस्त्यांचा आखाडा कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.
मात्र, यंदा कोणत्याच कार्यक्रमाविना झालेली यात्री नागरिकांच्या मनात रुखरुख निर्माण करणारी ठरली. कोरोनाचे संकट टळो आणि भविष्यातील प्रत्येक यात्रा उत्साही व्हावी नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, अशी प्रार्थना या वेळी साऱ्या भाविकांनी देवाकडे केली.
--
फोटो २८ लोणीकाळबोर अंबरनाथ जोगेश्वरी यात्रा
फोटो - अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा