लोणी कंद, लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:27+5:302021-03-24T04:11:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराला लागून असलेल्या लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहराला लागून असलेल्या लोणी काळभोर व लोणी कंद पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात केला आहे. मंगळवारपासून या दोन्ही पोलीस ठाण्याचे कामकाज पोलीस आयुक्तालयातून सुरु झाले आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांना अतिरिक्त मनुष्यबळ पुरविणार असून दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक समस्यांवर लक्ष देणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
नगर रस्त्यावरील लोणीकंद आणि सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर या दोन्ही पोलीस ठाण्याचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयातचा प्रस्ताव २०१७ मध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानंतर २६ ऑक्टोंबर रोजी लोणीकंद पोलीस ठाण्याचा समावेश परिमंडळ ४ मध्ये तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा समावेश परिमंडळ ५ मध्ये करण्याबाबतची अधिसूचना जारी केली होती. १६ मार्च रोजी या दोन्ही पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
पुणे ग्रामीण पोलीस दलातून या दोन्ही पोलीस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने पाठपुरावा सुरु केला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी आज लोणीकंद पोलीस ठाण्याला भेट दिली. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी आज लोणीकाळभोर पोलीस ठाण्याला भेट घेतली. तेथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून हद्दीतील कायदा सुव्यवस्थाची माहिती घेतली.
.....
नगर रस्त्यावरील वाघोली तसेच सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भाग शहराला लागून आहे. या भागात नागरिकीकरणाचा वेग वाढत असून तेथील गुन्हेगारी वाढ होत आहे. या भागातील वाहतूककोंडी सोडविणे, गस्त वाढवून नागरिकांना त्वरीत मदत उपलब्ध करून देणे, आपत्कालिन परिस्थितीत वेळेत मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या या दोन्ही पोलीस ठाण्यांसाठी मुख्यालयातून अधिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे