लोणीकंदला ‘दादां’चेच वर्चस्व!
By admin | Published: December 29, 2016 03:11 AM2016-12-29T03:11:33+5:302016-12-29T03:11:33+5:30
जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या लोणीकंद ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर ग्रामविकास पॅनलने
लोणीकंद : जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या लोणीकंद ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १४ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले प्रदीप कंद, शंकरकाका भूमकर, संदीप भोंडवे व श्रीमंत झुरुंगे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी विचार मंच पॅनलला फक्त वार्ड नं ५ मध्ये यश आले असून तेथील ३ जागा कशाबशा पदरात पडल्या. मात्र त्यांच्या आईचा पराभव झाला. भूमकर यांच्या घरातीलही दोघांना पराभवला सामोरे जावे लागले.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात निवडणूक निर्णय अधिकारी महेश वाघमारे यांनी निवडणूक मतमोजणी निकाल घोषणा केली. या वेळी घोषणेचा विवाद आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पोलिसांनी मिरवणुकीला विरोध केल्याने सभा घेण्यात आली. निकालानंतर ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी कोणी आपला शत्रू नसल्याचे सांगत ही विचारांची लढाई आहे. आमचे ध्येय हे वाड्या वस्त्यांचा व गावाचा विकास करणे हे आहे. तर प्रदीपभाऊ कंद यांनी ही चुरशीची लढाई झाली. मी माझा गड राखला आहे. इतर वार्डात आमच्या उमेदवारांनी २५ व काही ठिकाणी ५0 मते कमी पडल्याने त्यांचा पराभव झाल्याचे सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी महेश वाघमारे यांनी प्रत्येक वॉर्डची स्वतंत्र मतमोजणी केली. या वेळी त्याच वॉर्डातील फक्त उमेदवार अथवा प्रतिनिधी यांनाच प्रवेश होता. एक वॉर्ड संपला, की दुसरा वॉर्ड अशा क्रमाने मतमोजणी झाली नाही. निवडणूक निकालानंतर ‘एकच वादा प्रदीपदादा’ या घोषणेने आसमान दणाणून गेले. ढोल-ताशा निनाद व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी श्री म्हसोबा देवस्थानचे प्रारंभी दर्शन घेतले. प्रदीप कंद यांची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना केली होती. सर्व वॉर्डात ताकद लावली होती. पण त्यांना ग्रामस्थांनी साथ दिली. (वार्ताहर)
विजयी उमेदवार : सोमेश्वर : रामदास बबन ढगे, योगेश बाजीराव झुरुंगे, संगीता दिनेश शिंदे, शीतल ज्ञानेश्वर कंद, मंदा ज्ञानेश्वर कंद, संतोष अंकुश लोखंडे. सुरेखा किरण घोले, सोहम बाळासाहेब शिंदे, आशा विष्णू खलसे, शैलजा ज्ञानेश्वर कंद, सागर तुकाराम गायकवाड, जयश्री गणेश झुरुंगे, रवींद्र नारायण कंद, अश्विनी संतोष झुरुंगे.
स्वाभिमानी : रूपेश शिवाजी गावडे, सागर दत्तात्रय झुरुंगे, भाग्यश्री रूपेश कंद.