भविष्यातील शिक्षणाकडे जागतिक दृष्टिकोनातूनच पहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:41+5:302021-05-23T04:09:41+5:30
पुणे : पुढील काही वर्षांमध्ये शिक्षणाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून शिक्षण हे खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होणार आहे. त्यामुळेच ...
पुणे : पुढील काही वर्षांमध्ये शिक्षणाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून शिक्षण हे खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होणार आहे. त्यामुळेच भारतीय शिक्षणाकडे आता जागतिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे मत विविध शिक्षणतज्ज्ञांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित वेबिनारमध्ये केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व भारतीय विद्यापीठ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘आतंरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण समन्वय व सहकार्य’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सचिव डॉ. पंकज मित्तल, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू अनिरुद्ध पंडित, जगविख्यात विचारवंत संगीत वर्गीस, आयुकाचे संचालक डॉ. सोमक रायचौधरी, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, डॉ. अपूर्वा पालकर आदी सहभागी झाले होते.
डॉ. पंकज मित्तल म्हणाल्या की, सध्या भारतातून अन्य देशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या ही सुमारे १० लाख असून, भारतात शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या केवळ ४६ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळेच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले ज्ञान पोहोचवणे गरजेचे आहे.
अनिरुद्ध पंडित म्हणाले, पुढील काळात शिक्षणातील अडचणी जरी ‘लोकल’ असतील तरी त्यावर उपाय मात्र ‘ग्लोबल’ असणार आहेत. त्यानुसारच आपण तयारी करणे गरजेचे आहे.
संगीत वर्गीस म्हणाले की, पुढील दशक दोन दशकांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत व चीनसारख्या देशांकडे लोकशिक्षणासाठी वळतील. यासाठी शिक्षणात जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण आतापासूनच तयारी करायला हवी.
डॉ. सोमक रायचौधरी म्हणाले की, ज्याप्रमाणे विज्ञानाला कोणत्याही देशाची बंधने नाहीत, तसाच बदल येत्या काळात सर्वच क्षेत्रात होईल. कोरोनाकाळात जगाने तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले असून त्याप्रमाणे बदलही स्वीकारले आहेत. तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘व्हर्चुअल गुरुकुल’ पद्धत पुढे नेण्याचा भारताने प्रयत्न करावा.
-----------------------
कोरोनानंतर ‘ग्लोबल’ शिक्षणाची संकल्पना रुजण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन परीक्षा, डिजिटल क्लास, ई कंटेंटसारखे अनेक नवे प्रयोग विद्यापीठाने यशस्वी केले आहेत. नव्या शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यापीठे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यास प्रयत्नशील आहेत. विद्यापीठाचे होऊ घातलेले दोहा कतार येथील कॅम्पस हा याचाच एक भाग आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--------