पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी
By निलेश राऊत | Published: May 11, 2024 05:26 PM2024-05-11T17:26:27+5:302024-05-11T17:27:23+5:30
जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले....
पुणे : काँग्रेसला ६० वर्षे सत्ता देऊनही काही उपयोग झाला नाही. गेल्या १० वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढविल्या. २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले. जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मोहोळ भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, स्वरदा बापट, शैलेश टिळक यांच्यासह भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘रिपाइं’चे पदाधिकारी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, विकासकामे करताना पायाभूत सुविधा खूप महत्त्वाच्या असतात. गेल्या दहा वर्षांत सर्वत्र या सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे दळणवळण वाढले. वीज, पाणी, रस्ते यामुळे उद्योग वाढला आणि देशात रोजगार वाढला. आज देश विविध प्रकारच्या वस्तू आयात करण्यापेक्षा निर्यात करीत आहे. त्यामुळे भारत जगात तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनत आहे.
पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपुरे रस्ते यामुळे पुणेकर त्रस्त आहेत. त्यामुळेच रिंगरोडची आखणी केली असून, महामार्गावरील वाहतूक शहरात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी पुण्याच्या रिंगरोडची अलाइनमेंट पूर्ण झाली आहे. नवीन विमानतळ, रेल्वे, मेट्रो, डबलडेकर रस्ते यामुळे पुण्याचे जीवन सुसह्य होणार असून, बाहेरील रस्त्यांची कामे निवडणुकीनंतर सुरू होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.