पुणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांकडूनच 'लाखोंची लुटमार'; सहा पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
By नितीश गोवंडे | Published: April 6, 2023 04:56 PM2023-04-06T16:56:39+5:302023-04-06T16:59:33+5:30
गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांना एकाचवेळी तडकाफडकी खात्यातून निलंबीत करण्यात आले...
पुणे :रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा तपासणीच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांच्या सहा कर्मचाऱ्यांना एकाचवेळी तडकाफडकी खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे. सहायक फौजदार बाळू पाटोळे, पोलिस हवालदार सुनिल व्हटकर, प्रशांत डोईफोडे, जयंत रणदिवे, विशाल गोसावी, अमोल सोनावणे (सर्वांची नेमणूक लोहमार्ग पोलिस ठाणे, पुणेरेल्वे स्टेशन) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याबातचे आदेश लोहमार्ग पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिले.
दरम्यान जून २०२१ मध्ये लोहमार्ग पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह आठ जणांना निलंबित करण्यात होते. त्यातील सात जणांना खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईनंतर तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत लोहमार्ग पोलिसांच्या अपर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी सर्वांना निलंबीत केले होते. अंमली पदार्थाचा तपास एटीएसने आपल्याकडे घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
निलंबित करण्यात आलेल्या सहा जणांना ३ एप्रिल रोजी बॅग तपासणीचे कर्तव्य देण्यात आले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांनी एका तरुण-तरुणीला संशयावरून थांबवले. त्यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने त्यांना पोलिस निरीक्षकांच्या समोर हजर केले. त्यानंतर दोघांना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सोडून दिले. तशी नोंद ठाण्यातील दैनंदिनीत घेतली. दोघांना या कर्मचाऱ्यांनी गांजा बाळगल्याच्या संशयावरून अडवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांना सोडून दिले. असे पोलिस महासंचालक कार्यालय लोहमार्ग मुंबई यांच्याकडून लोहमार्ग अधीक्षकांना कळवण्यात आले.
याबाबत अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत आरपीएफकडून कोयना एक्स्प्रेस रेल्वे फलाटावर येण्याच्या तसेच आजू-बाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या. निलंबित सहा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात गंभीर कसूर केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना देण्यात आल्या आहेत. या सहा पोलिस कर्मचार्यांनी शासकीय कार्यालयात कर्तव्यावर असताना बेशीस्त, बेजबाबदार वर्तन करून शिस्तप्रिय पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होईल असे वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना खात्यातून निलंबीत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा...
या सहा कर्मचार्यांपैकी काही कर्मचारी आलटून-पालटून बदली करून घेत गेल्या २० वर्षांपासून येथेच नोकरी करत आहेत. त्यांच्या कर्तव्याचा जास्तीत जास्त कार्यकाळ हा लोहमार्ग पोलिस ठाण्यातीलच आहे. सहायक फौजदार बाळू पाटोळे आणि हवालदार सुनील व्हटकर या दोन कर्मचाऱ्यांवर बॅग तपासणी दरम्यान चोरी केल्याप्रकरणी एक जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. असे असताना देखील त्यांना पुन्हा बॅग तपासणीचीच जबाबदारी देण्यात आल्याने ही गंभीर बाब आहे.