Pune Crime: नगर रस्त्यावर लूटमार केली, चोरांवर लावला मोक्का
By विवेक भुसे | Published: February 1, 2024 05:57 PM2024-02-01T17:57:12+5:302024-02-01T17:58:08+5:30
पुणे : नगर रस्ता परिसरात लूटमार करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) ...
पुणे : नगर रस्ता परिसरात लूटमार करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख आरमान प्रल्हाद नानावत (वय २२, रा. पोटफोडे वस्ती, वढू खुर्द, ता. हवेली), ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा. चाकण रस्ता, शिक्रापूर) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
आरमान, त्याचा साथीदार ओंकार यांनी पादचारी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमारीचे गुन्हे केले होते. चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजेश नवले, रामचंद्र गुरव, सागर तारू यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला होता. पोलिस आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी देऊन नानावतसह साथीदाराविरुद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले. सहायक आयुक्त संजय पाटील तपास करत आहेत.
ईस्माईल शेरेकर टोळीवर मोक्का
लोहगाव परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ईस्माईल शेरेकर व त्याच्या ३ साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. इस्माईल मैनुद्दीन शेरेकर (रा. लक्ष्मीनगर पोलिस चौकीसमोर, येरवडा), कुणाल ऊर्फ राजा किसन जाधव (रा. चौधरी वस्ती, खराडी बासपास), सुदेश ऊर्फ बाब्या रुपेश गायकवाड (रा. सुभाषनगर, येरवडा), राहुल घाडगे ऊर्फ आर डी जी (रा. येरवडा) अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
शेरेकर याने त्याच्या साथीदारांसह संघटित टोळी करून खून, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करून दरोडा, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे केले आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला. शर्मा यांनी त्याची पडताळणी करून मंजुरी दिली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ११७ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.