जळोची जनावर बाजारात लुबाडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:04 AM2018-08-24T03:04:48+5:302018-08-24T03:05:06+5:30
नियमावली फक्त शेतकऱ्यांसाठी; व्यापाऱ्यांना खुली सूट, बाजाराच्या आवारात होते अवैध पार्किंग
- रविकिरण सासवडे
बारामती : जळोची उपबाजारातील जनावरे बाजारामध्ये बारामती बाजार समितीच्या कर्मचाºयांच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकºयांची लुबाडणूक सुरू आहे. तर व्यापाºयांची मात्र चंगळ होत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाजार समितीची नियमावली केवळ शेतकºयांसाठीच लागू आहे. व्यापाºयांना मात्र खुली सूट दिली जात असल्याचे निदर्शनास आले.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत जळोची येथे अद्ययावत जनावरे बाजार सुरू करण्यात आला. त्यामुळे येथील पशुपालक व शेतकºयांना या जनावरे बाजाराचा फायदा झाला. या ठिकाणी बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यांसह सातारा, सोलापूर, नगर भागातील व्यापारी व शेतकरीदेखील आपली जनावरे घेऊन खरेदी-विक्रीसाठी येऊ लागली. मात्र, येथे भाडेपावती करणाºया तसेच जनावरे बाजारातून घेऊन जाताना खरेदी पावती करणाºया कर्मचाºयांच्या मनमानी पद्धतीने पावत्या फाडतात. येथील काही शेतकºयांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, खरेदी पावतीसाठी कर्मचाºयांकडून थांबवून ठेवले जाते. एका वेळी एकाच जनावरांची पावती करणे अनिवार्य असताना एकाच पावतीवर व्यापाºयांची चार-पाच जनावरे सोडली जातात. तर शेतकºयांकडून मात्र प्रत्येक जनावराची खरेदी पावती केली जाते. व्यापारी प्रत्येक बाजारात खरेदी-विक्रीसाठी असल्याने कर्मचारी व व्यापाºयांचे साटेलोटे आहे. तर शेतकरी कधीतरी बाजार येत असल्याने कर्मचाºयांकडून त्यांची अडवणूक केली जाते.
तसेच जनावरे बाजाराच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दुचाकी, चारचाकी, टेम्पो, स्टॉल, चहाचे गाडे, टपºया आदींना परवानगी नसताना देखील सर्रासपणे बाजाराच्या आवारामध्ये वाहने उभी केली जातात. मुख्य प्रवेशद्वाराच्या मार्गावर मिल्किंग मशीन कंपनीच्या गाड्या, एलईडी बल्ब विक्री करणारे, माईकवरून कर्णकर्कश्श आवाजात गाणी तसेच जाहिराती वाजवतात. त्यामुळे जनावरे घाबरून बिथरतात. या प्रकारामुळे एखादे जनावर बिथरले व कोणास दुखापत केल्यास जनावराच्या मालकाच्या माथी हे खापर फोडले जाणार, याबाबत संबंधित स्टॉलधारकांनी जाहिराती, गाणी न वाजवण्याची विनंती केली असता त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तर काही वेळा वादाचेही प्रसंग उभे राहतात. यामध्ये कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये कोणत्याही व्यावसायिकास परवानगी नसताना चिरीमिरी मिळत असल्याने स्टॉलधारक बाजाराच्या आवारात व्यवसाय करत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.
मागील वर्षी आम्ही चुकीचे काम करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करणार असल्याचे पत्र काढले होते. त्या पत्रानुसार गुरुवारी (दि. २३) जनावरे बाजारात झालेल्या प्रकाराची चौकशी करून दोषी कर्मचाºयांना १५ दिवसांसाठी निलंबित केले जाईल.
- अरविंद जगताप, सचिव,
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती