शेतकऱ्यांची लूट सुरूच; नव्या दरानेच खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:26+5:302021-05-25T04:12:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र शासनाने जरी खतांच्या किमती कमी केल्या असल्या, तरी जिल्ह्यात मात्र नव्या ...

Looting of farmers continues; Buy at new rates! | शेतकऱ्यांची लूट सुरूच; नव्या दरानेच खरेदी !

शेतकऱ्यांची लूट सुरूच; नव्या दरानेच खरेदी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र शासनाने जरी खतांच्या किमती कमी केल्या असल्या, तरी जिल्ह्यात मात्र नव्या दरानेच खतांची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी पावसामुळे आणि कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या वर्षी तरी दिलासा मिळेल, या आशेत शेतकरी असताना खतांच्या किमती वाढल्या असल्याने सरकारने एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताने घेतले, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिल्या.

जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. काही ठिकाणी पाऊस झाला असल्याने ज्यांनी जमिनीच्या मशागती केल्या अशांनी पेरण्यासुद्धा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र २ लाख १९ हजार ७०० हेक्टर एवढे आहे. भात, बाजरी, मका, रागी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन या प्रमुख पिकांची लागवड दर वर्षी केल्या जाते. यासोबतच कांदा, तरकारी पिकांचेही जिल्ह्यात प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यामुळे या पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. मात्र, रासायनिक खत कंपन्यांनी ऐन कोविडकाळात वाढविलेल्या रासायनिक खतांच्या किमतीमुळे शेतकरी अडचणीत गेले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या तीव्र नाराजीनंतर, केंद्र सरकारने अंशदान वाढवून डीएपी खताचे दर १२०० रुपये प्रतिपिशवीपर्यंत ठेवले.

खतांच्या वाढलेल्या किमतीवरून देशभर चांगलाच गोंधळ उडाला होता. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली होती. विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर तुटून पडत होते. याचाच परिणाम म्हणून केंद्राने खतांच्या अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांना जुन्याच किमतीत खते देण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात वाढलेल्या किमती पाहून काही व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, बारामती या तालुक्यातील खतविक्रेत्यांकडे जाऊन ‘लोकमत’ने पाहणी केली. यात काही ठिकाणी जादा दाराने खत विक्री होत असल्याचे आढळले. तर खतांच्या किमतीत संभ्रमावस्था असल्याने काही विक्रेत्यांनी खतांची विक्रीच सुरू केली नसल्याचे या पाहणीत आढळले.

कोट

वेल्हे तालुक्यातील १८ गाव मावळ, पासली, केळद, जाधवाडी, निगडे, कुंबळे, वरोती, वाजेघर, भूतोंडे, दादवडी, मेरवणे, वांगणी, सोंडे, कारला सोंडे, माथना कोडवडी परिसरात सध्या भात रोपे बनवण्याची कामे चालू आहेत, त्यामुळे खतांची मागणी वाढली आहे. परंतु नवीन दर प्रमाणे खतांची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेताला खत घेण्यासाठी गेले असता नवीन दराने खताची विक्री होत आहे, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे जुन्या दराने खत विक्री होणे आवश्यक आहे, तरीदेखील नवीन दराने खताची विक्री होत असल्याने आमची आर्थिक पिळवणूक होत आहे.

- संतोष लिम्हण, शेतकरी

-----

कोट

केंद्र सरकारने खतांच्या किमती अवाच्या सवा वाढवल्या होत्या. मात्र, खतांच्या अनुदानात वाढ करून जुन्याच किमतीत खत मिळणार असल्याचे समजतेय. यामुळे आम्ही सेंद्रिय खत वापरण्यावर भर दिलेला आहे.

- गणेश अनपट शेतकरी (भोडणी )

हे घ्या पुरावे

वेल्हे तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागवड केली जाते. सध्या खतांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. या ठिकाणी चढ्यादराने खतांची विक्री होत होती. यासंदर्भात विक्रेत्याला विचारले असता, सम्राटच्या एकूण १०० पिशव्या १ हजार ९०० रुपये दराने विक्रीसाठी घेतल्या असून, जुन्या दराप्रमाणे विकल्यास एक पिशवी बाराशे रुपयाला विकावी लागेल. एका पिशवीमागे सातशे रुपये तूट कोण भरून काढणार? असे नाव न छापण्याच्या अटीवर त्याने सांगितले.

---

लाखेवाडी परिसरात जुन्याच दराने खतविक्री सुरू असल्याचे चित्र आहे. खत विक्रेत्यांनी खतांच्या वाढलेल्या किमती व अपुरी मागणी यामुळे नवीन खताची खरेदी न करणेच पसंत केले आहे. परिणामी, जुन्याच दराने खताची विक्री सुरू आहे.

----

खेड तालुक्यातील काही केंद्रांवर चढ्या भावाने खताची विक्री सुरू होती. डीएपी खताच्या किमती शासनाने १ हजार २०० रुपये ठेवली आहे. मात्र, १४०० ते १५०० रुपयाने या खताची विक्री होत असल्याचे आढळले.

खतांचे जुने दर :

१) १०:२६:२६ - १२२० रुपये

२) पॉटेश - ८७० रुपये

३) १५:१५:१५ - १०४० रुपये

४) १९:१९:१९ - १२८० रुपये

५) एसएसपी - ३८० रुपये

————————————————

२० मे २०२१ पासून नवीन दर

१) महाधन डीएपी (आयातीत) - १२०० रुपये

२) महाधन २४:२४:० - १४५० रुपये

३) महाधन स्मार्टेक १०:२६:२६ - १३९० रुपये

४) महाधन स्मार्टेक १२:३२:१६ - १३७० रुपये

५) महाधन स्मार्टेक १४:२८:० - १२८० रुपये

६) महाधन स्मार्टेक २०:२०:०:१३ - ११५० रुपये

७) महाधन १६:१६:१६ (आयातीत) - ११२५ रुपये)

----------------------

२० मे २०२१ पासून नवीन दर

डीएपी १८:४६:० - १२०० रुपये

एमपीके १०:२६:२६ - १३७५ रुपये

एनपीके १२:३२:१६ - १३१० रुपये

एनपीके १९:१९:१९ - १५७५ रुपये

एनपीएस २०:२०:०:१३ - १०९० रुपये

एनपी २८:२८:० - १४७५ रुपये

एनपीके १४:३५:१४ - १३६५ रुपये

———————————————

वेल्हे (ता.वेल्हे) खत खरेदी करण्यासाठी दुकानासमोर लागलेली रांग.

————————————————

फोटो ओळी : लाखेवाडी परिसरातील खत विक्री केंद्र.

२४०५२०२१-बारामती-०१

२४०५२०२१-बारामती-०२

Web Title: Looting of farmers continues; Buy at new rates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.