राशीच्या खड्यांद्वारे अनेकांना गंडा
By admin | Published: October 26, 2016 05:49 AM2016-10-26T05:49:02+5:302016-10-26T05:49:02+5:30
ग्रहपीडा झालीय, सुखी जीवन जगायचे, व्यवसायात वृद्धी करायची, मग राशीचा खडा घाला आणि बघा चमत्कार असे म्हणत दोन युवकांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेक
तळेगाव दाभाडे : ग्रहपीडा झालीय, सुखी जीवन जगायचे, व्यवसायात वृद्धी करायची, मग राशीचा खडा घाला आणि बघा चमत्कार असे म्हणत दोन युवकांनी पिंपरी-चिंचवडमधील अनेक सुशिक्षित नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकाराबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल होत नसल्याने हा प्रकार वाढत चालला आहे.
शहर परिसरातील महाविद्यालयात दोन युवक फिरत आहेत. त्यांच्याजवळ विविध राशींचे खडे आहेत. हे खडे प्रत्येकी दोन ते चार हजार रुपयांना विकतात. ते खरेदी करण्यासाठी हे युवक एक प्रात्यक्षिक दाखवितात. त्यांच्याकडे एक वाटी आहे. त्यात खडे ठेवले जातात. राशीला अनुकूल असणारा खडा वाटीमध्ये फिरतो. तसेच इतर खडे वाटीमध्ये स्थिर राहतात. त्यामुळे हा खडा आपल्या राशीसाठी योग्य आहे, असे वाटल्याने अनेक जण या खड्याची खरेदी करत आहेत.
निगडी प्राधिकरण परिसरात असणाऱ्या एका महाविद्यालयात हे तरुण खडा विकण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्याकडे चार ग्राहकांनी चौकशी केली. एका ग्राहकाला त्यांनी गुरूचा खडा योग्य असल्याचे सांगितले. दुसऱ्या ग्राहकाला त्यांनी दोन खडे घालण्याची गरज असल्याचे सांगितले. या युवकांनी अशाच प्रकारे अनेक जणांना गंडा घातला आहे.
अशिक्षित लोकांना टार्गेट करून अंधश्रद्धा पसरविली जाते. पण, हे युवक बोलण्याची कसब दाखवून सुशिक्षितांना भुरळ पाडत आहेत. अनेक जण त्यांच्या करामतीला फसले आहेत. (वार्ताहर)
अन् युवक झाले निरुत्तर
एका महाविद्यालयात युवक खडे विकण्यासाठी गेले. तेथील अनेक शिक्षकांनी खड्यांची खरेदी केली. हाच धागा पकडत त्याच शाळेतील एका शिक्षकाकडे गेले. त्यांनी खडा आणि प्रात्यक्षिक पाहिले. खडे विकणाऱ्या युवकांना मला गृहदक्षा नाही, मला दुसरी कुठली व्यथा नाही. पण, मला व्यसन आहे, ते सोडण्यासाठी या खड्याचा वापर होईल का, हे विचारले असता, युवक निरुत्तर झाले आणि त्यांनी त्या महाविद्यालयातून काढता पाय घेतला.