‘सुजलाम्’ला अखेर टाळे
By admin | Published: May 26, 2017 05:48 AM2017-05-26T05:48:14+5:302017-05-26T05:48:14+5:30
येथील रासायनिक प्रकल्पातील सुजलाम् केमिकल्स या कंपनीला अवैधरीत्या अमली पदार्थ उत्पादन केल्यामुळे अखेर टाळे ठोकण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : येथील रासायनिक प्रकल्पातील सुजलाम् केमिकल्स या कंपनीला अवैधरीत्या अमली पदार्थ उत्पादन केल्यामुळे अखेर टाळे ठोकण्यात आले.
जवळपास चोवीस तास चाललेल्या तपासात अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये या कंपनीचा मालक हरिश्चंद्र दोरगेला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी दोरगेला मुंबई येथे मुद्देमालासह अटक केल्यानंतर कुरकुंभ येथील त्याची कंपनी जिथे तो अवैधरीत्या अमली पदार्थ बनवत होता त्या सुजलाम केमिकल्समध्ये छापा टाकला. यामध्ये अमली पदार्थ बनवण्याचा कच्चामाल जप्त करण्यात आला आहे. तपासात विविध पुरावे, कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्यावर पुढील कार्यवाहीसाठी अटक करून अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत या कंपनीशी निगडित असणारी सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. त्यामुळे या पुढेही आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुजलाम् केमिकल्सचा मालक दोरगे हा स्वत: केमिकल इंजिनिअर असून, अमली पदार्थ बनवण्याचे काम तो खुद्द करीत असल्याची माहिती मिळत आहे. जास्त करून रात्रीच्या वेळी कंपनी चालवून कामगारांना या प्रकारपासून होईल तितके दूर ठेवूनच काम करीत होता. यामध्ये त्याने कमालीची गुप्तता पाळली होती. रासायनिक प्रक्रियेची कामगारांना माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असल्याचे बोलले जात आहे.
दोरगेने मोठ्या प्रमाणात माया जमा केली असल्याची माहिती समोर येत आहे. आलिशान गाड्या, विविध ठिकाणी स्थावर मालमत्तादेखील असल्याचे बोलले जात असल्यामुळे अमली पदार्थ बनवण्याचा त्याचा धंदा खूप दिवसापासून सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका छोट्याशा जागेत सुरूअसणाऱ्या कंपनीत अवैधरीत्या अमली पदार्थ उत्पादन करून ते तो बाजारात विकत. त्यावर काय कार्यवाही होणार का हे पाहणे गरजेचे आहे
कुरकुंभ : सहा महिन्यांपूर्वी समर्थ लॅब या कंपनीतून अशाच प्रकारे मेफेड्रीन या अमली पदार्थाचे अवैधरीत्या उत्पादन करून बाजारात पाठविले जात होते. त्याही वेळी करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली होती. तर, सुजलाम् केमिकल्स कंपनीने त्यापुढे दोन पावले जाऊन अशाच प्रकारे करोडोंचे मेफेड्रीन उत्पादन करून एकच खळबळ उडवून दिली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांमध्ये केले जाणारे उत्पादन, त्यांना लागणारा कच्चा माल, विविध रसायनांचा साठा यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. तरीही, अशा
प्रकारच्या अवैध व्यवसायाचे धाडस कंपनीमालक करीत
आहेत. याचा अर्थ, ज्या यंत्रणा हे तपासणीचे काम करतात,
त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.