चळवळींमधील मोठा योद्धा गमावला
By admin | Published: April 14, 2015 01:46 AM2015-04-14T01:46:55+5:302015-04-14T01:46:55+5:30
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत हे चांगल्या अर्थाने अस्वस्थ असलेला माणूस होता, विविध चळवळींमध्ये त्यांनी सहभागी होऊन चळवळींना विचार देण्याचे काम केले.
पुणे : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत हे चांगल्या अर्थाने अस्वस्थ असलेला माणूस होता, विविध चळवळींमध्ये त्यांनी सहभागी होऊन चळवळींना विचार देण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने चळवळींमधील मोठा योद्धा गमावला असल्याची भावना सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये मान्यवरांनी सोमवारी व्यक्त केली.
राज्यशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. प्रा. सुहास पळशीकर, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, स्त्री अभ्यास केंद्राच्या माजी संचालिका विद्युत भागवत, चळवळीतील कार्यकर्ते किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी उपस्थित होते.
सुहास पळशीकर म्हणाले, ‘‘प्रा. सुमंत आणि मी गेल्या ४० वर्षांपासूनचे सहकारी होतो. जून १९८९ मध्ये मी व यशवंत सुमंत राज्यशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्रा. सुमंत यांच्यामध्ये एक चळवळवाला दडलेला होता. तो दर दशकामध्ये डोकं वर काढायचा.’’
हर्ष जगताप म्हणाले, ‘‘नवमार्क्सवादी, नवआंबेडकरवादी, नवसमाजवादी यांनी संस्थात्मक राजकारणाचे खच्चीकरण केले. डॉ. सुमंत यांची चळवळींच्या सर्व प्रवाहांशी नाळ जुळलेली होती. ते नंतरच्या काळात गांधीवादाकडे झुकले, त्यांना धर्म घेऊन काही बोलायचे असल्यानेच त्यांनी गांधीवाद स्वीकारला असावा. विचावंत शिकवित असताना त्या विचारवंतांवर अन्याय होता कामा नये असे ते नेहमी बजावायचे.’’
हणमंत फाटक म्हणाले, ‘‘सुमंत सरांच्या बोलण्यातून जगण्याची प्रेरणा ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना मिळायची. सरांचा तास ही साधना असायची. सरांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक कधीच नव्हता.’’
(प्रतिनिधी)
यशवंत सुमंत यांच्या नावाने पुरस्कार
४डॉ. यशवंत सुमंत यांच्या नावाने पदवीदान समारंभात पुरस्कार सुरू व्हावा याबाबत प्रयत्न करण्यात येत असून, लवकरच त्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मानस, नीती व समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खांदवे यांनी दिली.