भोर तालुक्यातील आपटीत आग, ६० लाखांचे नुकसान..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:53 PM2019-06-20T15:53:19+5:302019-06-20T15:56:24+5:30
आपटी येथील पाच घरांना पहाटे अडीच वाजता आग लागली. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या गाईने हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागे झाल्याने घरात रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या १५ ते २० जणांचे व जनावरांचे प्राण वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
भोर : आपटी (ता. भोर) येथील पाच घरांना लागलेल्या आगीत संपूर्ण घरे जळून खाक झाली असून घरातील धान्य, कपडे, जनावरांचा चारा, सरपण, जमिनीची महत्त्वाची कागदपत्रे, सोन्याच्या मौल्यवान वस्तू जळून सुमारे ६० ते ६५ लाखांचे नुकसान झाले झाले. ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीत एक शेतकरी, एक गाय आणि वासरू भाजले आहे. मात्र गोठ्यात बांधलेल्या गाईने हंबरडा फोडल्याने झोपेत असलेले घरातील लोक जागे झाल्याने घरातील १५ ते २० लोकांचे प्राण वाचले. ऐन पावसाळ्यात घराला आग लागल्याने पाच कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे घराचे पंचनामे करून शेतकºयांनी घरांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
भोर शहरापासून १३ किलोमीटरवर असलेल्या भोर-महाड रोडवरील आपटी गावात आज पहाटे अडीच्या सुमारास आग लागून आगीत लक्ष्मण जानू पारठे, सरूबाई गणपत पारठे, श्रीपती धोंडिबा साळेकर, चंद्रकांत बाळू साळेकर, खंडू बाळू साळेकर यांची घरे जळून खाक झाली आहेत. तहसीलदार अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, तलाठी स्वप्निल आंबेकर, ग्रामसेवक विशाल अनंतकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबतची माहिती अशी : आज पहाटे पाच घरांना आग लागली, या आगीत पाचही घरांतील धान्य, कपडे, सोन्या-चांदीचे दागदागिने व मौल्यवान वस्तू, जनावरांचा चारा, पावसाळ्यासाठी साचवलेले सरपण, मुलांचे शाळेचे साहित्य, जमिनीची कागदपत्रे, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली असून आगीत प्रत्येक शेतकºयाचे १२ लाखांचे असे एकूण ६० लाख रुपयांचे नुकसान झाले असून ऐन पावसाळ्यात घरे जळाल्याने राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांचा तलाठी यांनी पंचनामा केला असून अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. आग लागल्यावर गाईने हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागे झाले, त्यावेळी पेटलेल्या कडब्याच्या पेंड्या खाली पडत असल्याचे पाहिल्यावर घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यावर गावातील नागरिक गोळा झाले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनमधून पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने भोर नगरपालिकेची अग्निशमन गाडी बोलावण्यात आली, ती ५ वाजता आल्यावर आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत पाचही घरांतील सर्व सामान जळून खाक झाले असून पाच कुटुंबे ऐन पावसाळ्यात रस्त्यावर आली आहेत. घरात झोपलेले श्रीपती धोंडिबा साळेकर (वय ६८, रा. आपटी, ता. भोर) २५ टक्के भाजले असून
त्यांची एक गाय व एक वासरू भाजले आहे. श्रीपती साळेकर यांच्यावर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
............
या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या गाईने हंबरडा फोडल्याने घरातील लोक जागे झाल्याने घरात रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या १५ ते २० जणांचे व जनावरांचे प्राण वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.