पुणे बाजारसमितीचा लेखापरीक्षणाला खो
By admin | Published: May 10, 2014 08:07 PM2014-05-10T20:07:09+5:302014-05-10T20:27:41+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन व पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तीन वर्षांचे लेखापरीक्षणच नाही : पणन संचालकांनी घेतली झाडाझडती
पुणे : राज्यातील सर्वांत मोठ्या बाजार समितीत गणल्या जाणार्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन व पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी या प्रकरणी पुणे बाजार समितीच्या प्रशासकांचे कान टोचले असून, लवकरच मुंबई बाजार समितीची देखील झाडाझडती घेण्यात येणार आहे.
पणन संचालकांनी राज्यातील बाजार समितीच्या कारभाराचा आढावा घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. लातुर, नागपूर विभाग व मुंबई बाजार समिती वगळता इतर बाजार समितींना त्यांनी भेट दिली आहे. गेल्या आठवड्यात पुणे बाजार समितीच्या कारभाराची त्यांनी झाडाझडती घेतली. शेतकरी व बाजार घटकातील व्यक्तींच्या तक्रारींवर देखील त्यांनी सुनावणी घेतली.
याबाबत डॉ. माने म्हणाले, मुंबई व पुणे या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत. मात्र तेथे प्रशासकीय शिस्त आजिबात पाळली जात नाही. पुणे बाजार समितीने तर तीन वर्षांचे लेखापरीक्षणच केलेले नाही. त्यांना तातडीने लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतमालाचा लिलाव केला जातो की नाही ? बाजार समितीचा सेस योग्य पद्धतीने भरला जातो की नाही ? याची बाजार समितीने काटेकोर तपासणी केली पाहीजे. मात्र अशी तपासणीच होत नाही. मे महिनाअखेरीस पुणे बाजार समितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल. त्याचबरोबर मुंबई बाजार समितीची देखील लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे.
तर आडते, बाजार निरीक्षकांवर कारवाई
गुलटेकडी मार्केटयार्डात बहुतांश आडते कृषी मालाचा लिलावच करीत नसल्याची माहिती समोर आली आहे. कृषी मालाचा लिलाव करणे बंधनकारक आहे. तसेच मालाचा लिलाव होतो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार निरीक्षक व पर्यवेक्षकांची आहे. कृषी मालाचा लिलाव न करणार्या आडत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, तर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अधिकार्यांवर देखील कारवाई केली जाईल, असे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी स्पष्ट केले.