नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शहर काँग्रेसचे नुकसान

By admin | Published: December 29, 2016 03:16 AM2016-12-29T03:16:43+5:302016-12-29T03:16:43+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहेत. काँगे्रसच्या विद्यमान सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार

The loss of the city due to the neglect of the leaders | नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शहर काँग्रेसचे नुकसान

नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शहर काँग्रेसचे नुकसान

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजू लागले आहेत. काँगे्रसच्या विद्यमान सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना ताकत न दिल्याने, लक्ष न दिल्याने गेल्या अनेक वर्षांत काँग्रेस पिछाडीवर गेली आहे.
शहराच्या राजकारणात, विकासात काँग्रेसचे योगदान वादातीत आहे. दिवंगत सांस्कृतिक कार्यमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहरविकासावर आपला ठसा उमटविला. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चिंचवड प्रेक्षागृह आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्यामुळेच शहरात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतरही प्रा. मोरेंमुळेच काँग्रेसचे महापालिकेतील वर्चस्व, ताकत कायम ठेवली होती. सत्तेत समान भागीदार असत. मात्र, सरांच्या निधनानंतर काँग्रेसची ताकत विखुरली गेली. त्यानंतर काँग्रेसला खिळखिळे करण्याचे प्रयत्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आले.
२००२च्या निवडणूकीत ३२ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यानंतर २००७ च्या निवडणूकीत १९ जागा आणि २०१२ च्या निवडणूकीत १४ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. गौतम चाबुकस्वार शिवसेनेत गेल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ १३वर आले. प्रा. मोरेंचे वारसदार माजी शहराध्यक्ष हनुमंत गावडे यांच्यासह ११ जणांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले, तर तत्कालीन शहराध्यक्ष श्रीरंग बारणे शिवसेनेत गेले. त्यानंतर भाऊसाहेब भोईर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची सूत्रे आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या जागावाटपात २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला. पक्षाची उमेदवारी भोईरांना देऊन अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीने निवडून आणले. पवारनीतीमुळे भोईरांचा पराभव झाला. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही केवळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा गड म्हणून पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरण समितीही निवडली गेली नाही.
विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्याही नियुक्त्या न केल्यानंतर भोईर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सचिन साठे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली. मात्र, भोईर आणि साठे यांच्या समर्थकांत अधूनमधून धुसफूस सुरू असते. वर्चस्ववादाची लढाई सुरूच होती. पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असल्याचे सूचित केले होते. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होऊ शकते. त्यामुळे भोईर गटाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.(प्रतिनिधी)

भोईरांचे पवारांशी गुफ्तगू
१पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पवार यांनी भोईरांशी गुफ्तगू केले. त्यामुळे महिनाभरात १० नगरसेवकांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होती. एक एक करून विद्यमान आणि माजी नगरसेवक आणि पदाधिकारी इतर पक्षांत जात आहेत. पदाधिकारी पक्ष सोडून का जाताहेत, हेही पक्षश्रेष्ठींनी समजून घ्यायला हवे. मात्र, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून लक्ष दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील किंवा देशातील काँग्रेसच्या नेत्यांचेही शहराकडे दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा पवारांनी घेतला.

गटबाजीलाही उधाण
२१५ वर्षांत शहरातील राजकारणात बदल झाला आहे. पक्षापेक्षा व्यक्तिगत राजकारण करण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पूर्वी या शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असे प्रमुख गट मानले जायचे. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजित पवार यांनी लक्ष घातल्यानंतर साहेब, दादा आणि सर असे तीन गट मानले जायचे. मात्र, पक्ष आणि नेत्यांच्या नावावर चालणारे राजकारण संपले आहे. स्थानिक नेत्यांच्या नावाने गटबाजी सुरू झाली आहे. अशाच प्रकारचे गट काँग्रेस आणि इतर पक्षांतही निर्माण झाले आहेत.
‘लोकमत’मध्ये वृत्त
३पुणे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले. या निकालावर फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे. त्यावरूनच आघाडी
होणार की नाही, हे निश्चित आहे. काँग्रेस फोडण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने व्यूहरचना
केली आहे. पुढील महिना काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानला जात आहे, याबाबत लोकमतने मागील आठवड्यात काँग्रेसला धोक्याची घंटा हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते, हे वृत्त खरे ठरले आहे.

Web Title: The loss of the city due to the neglect of the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.