राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:17 AM2023-03-21T11:17:25+5:302023-03-21T11:17:37+5:30

राज्यात पावसाच्या तडाख्याने बळीराजाला मोठा फटका बसला

Loss of crops on nearly 1 lakh hectares in the state Hope for immediate compensation to farmers | राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

राज्यात तब्बल १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीच्या नुकसान भरपाईची आशा

googlenewsNext

नितीन चौधरी

पुणे : राज्यात दोन टप्प्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे २५ जिल्ह्यांमधील तब्बल १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापैकी केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा पंचनाम्याच्या कामाला फटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने पंचनाम्यांचे काम वेगाने होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तर जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

राज्यात ४ ते ९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ९६६ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अवस्थेत असतानाचा पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यानंतर या पिकांचे पंचनामे होणे अपेक्षित असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्याचा सर्वाधिक फटका नुकसानीच्या पंचनाम्यांना झाला. त्यानंतर पुन्हा अवकाळीचा फटका बसला. १५ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळीमुळे राज्यातील सुमारे १ लाख ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यातील २३ हजार ८२१ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. त्या खालोखाल जालना जिल्ह्यातील १५ हजार ८० हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने आतापर्यंत राज्यात केवळ ७ हजार ८०० हेक्टरवरील पिकांचेच पंचनामे झाले आहेत. त्यासाठी कृषी विभागाने कृषी सेवकांची मदत घेतली. मात्र, सर्व पंचनामे होऊ शकले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने या पंचनाम्यांना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत हे काम करण्यास वेग येईल, अशा आशावाद कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

जिल्हानिहाय नुकसानग्रस्त क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ठाणे ११७, पालघर २०१७, रायगड ४३२, सिंधुदुर्ग ४३, नाशिक ४२७५, धुळे ९०१७, नंदुरबार १८१४, जळगाव ९५२९, नगर १२१९८, पुणे ५७९, सोलापूर ३९७७, सातारा ४८४, संभाजीनगर ७७६२, बीड ११३६५, जालना १५०८०, नांदेड २३८२१, परभणी २४००, लातूर ११७९५, हिंगोल ५६०४, अमरावती १५१७, यवतमाळ ६५३९, बुलढाणा ३१४७, वाशिम ४९८१, अकोला ६४३, वर्धा ८६ : एकूण १३९२२२

Web Title: Loss of crops on nearly 1 lakh hectares in the state Hope for immediate compensation to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.