पीएमपीचा तोटा कमी झाला होता; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 01:48 AM2018-08-31T01:48:33+5:302018-08-31T01:49:21+5:30
सक्षम अधिकारी ठरले तारणहार : तरी यंदाच्या वर्षी २०४.६२ कोटींचा तोटा
पुणे : सातत्याने तोट्यात जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सक्षम अधिकारी नफ्यात आणू शकतात, हे मागील काही वर्षांच्या आर्थिक ताळेबंदावरून स्पष्ट झाले आहे. मागील ८ वर्षांत केवळ डॉ. श्रीकर परदेशी व तुकाराम मुंढे यांनी केलेल्या सुधारणांमुळे तोटा घटल्याचे दिसते. विशेष म्हणजे, दोन्ही अधिकाºयांना कमी कालावधी मिळाला होता. मागील वर्षी खर्च वाढूनही पीएमपीचा तोटा सुमारे ६ कोटींनी कमी झाला आहे.
पीएमपीचा आर्थिक वर्ष २०१७-१८चा आर्थिक ताळेबंद गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर संचालक व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. मागील वर्षी पीएमपीला एकूण ६५८ कोटी ५१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मात्र, ८६३ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च झाल्याने एकूण तोटा सुमारे २०४ कोटी रुपयांवर गेला. आर्थिक वर्ष २०१६-१७ पेक्षा हा तोटा ५.८२ कोटींनी कमी झाला आहे. तर, मागील वर्षीच्या खर्चात १४.६६ कोटी रुपयांत वाढ झाली आहे. डॉ. परदेशी यांच्याकडे १२ डिसेंबर २०१४मध्ये पीएमपीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यांना केवळ चार महिन्यांचा कालावधी मिळाला; पण त्यादरम्यान त्यांनीही पीएमपीची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. दररोजच्या उत्पन्नातील ६ टक्के रक्कम केवळ बसच्या देखभाल-दुरुस्तीसाठी देण्याचा त्यांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. मार्गांचे सुसूत्रीकरण, बसवाढीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. या कामाचा प्रत्यक्ष फायदा आर्थिक वर्ष २०१५-१६मध्ये झाला. आर्थिक वर्ष २०१४-१५मध्ये पीएमपीची तूट १६७.६८ कोटी रुपये होती. पुढील वर्षात ही तूट १५१.८० कोटींपर्यंत खाली आली. मात्र, १६-१७मध्ये पुन्हा हा तोटा सुमारे २१० कोटींवर गेला.
मुंढे यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात पीएमपीचा पदभार स्वीकारला. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच कामात शिस्त आणण्यापासून खर्चात कपात करण्याचे धोरण अवलंबिले. तसेच मार्ग, पासचे सुसूत्रीकरण, ठेकेदारांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई, मार्गांवरील बसमध्ये वाढ, ब्रेकडाऊन कमी करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. ठेकेदारांपेक्षा पीएमपीच्या मालकीच्या बस अधिक प्रमाणात मार्गावर आणल्या. या बदलांमुळे पीएमपीचे उत्पन्न २०.४८ कोटींनी वाढले. दोन्ही अधिकाºयांनी केलेल्या बदलांमुळे तोटा घटल्याचे अधिकाºयांनीही मान्य केले. त्यामुळे परदेशी, मुंढे यांच्यासारखे पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यास पीएमपीला ‘अच्छे दिन’ येतील, हे अधोरेखित होते.
‘पीएमपी’चा आर्थिक ताळेबंद
(आकडे कोटींत)
घटक २०१६-१७ २०१७-१८ फरक
एकूण उत्पन्न ६३८.०३ ६५८.५२ २०.८५ वाढ
एकूण खर्च ८४८.४७ ८६३.१४ १४.६६ वाढ
एकूण तोटा २१०.४४ २०४.६२ ५.८२ घट
तिकीट उत्पन्न ३८२.५० ४०८.८१ २५.६५ वाढ
इंधन खर्च ९०.९० ११६.५६ २५.६५ वाढ
ठेकेदारांना दंड २१.०६ ३७.२१ १६.१५ वाढ
देखभाल खर्च २७.५८ ३७.४५ ९.८७ वाढ
पास उत्पन्न ११५.०४ १०४.८७ १०.१७ घट
बसभाडे १२.९६ १०.३७ २.५९ घट
पास अनुदान ७३.५८ ६५.१५ ८.४३ घट
पुढील काळातही पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातील. ब्रेकडाऊन कमी करणे, तिकीट विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न, तोट्यातील मार्ग कमी करणे, मार्गांचे सुसूत्रीकरण अशा सर्व बाबींचा बृहत् आराखडा तयार करण्याचा विचार आहे. - सिद्धार्थ शिरोळे,
नगरसेवक व पीएमपी संचालक
असे मिळाले उत्पन्न
तिकीट व पास
विक्री - ६७.२५ टक्के
जाहिरात - १.१९ टक्के
दंड - ४.२८ टक्के
संचालन तूट २५ टक्के
असा झाला खर्च
वेतन व इतर प्रशासकीय - ५१ टक्के
इंधन - १३.५ टक्के
बसभाडे - २५.५ टक्के
देखभाल-दुरुस्ती - ४.५ टक्के
सुरक्षा - १ टक्के
ई-टिकेटिंग - १.१ टक्के
इतर - ३.७ टक्के
ठळक वैशिष्ट्ये
४एकूण तोटा ५.८२ कोटींनी घटला
४उत्पन्न २०.४८ कोटींनी वाढले
४प्रतिकिलोमीटर ३७ पैसे वाढ
४एकूण खर्चात १४.६६ कोटींची वाढ
४प्रशासकीय खर्चात २८ कोटींची वाढ
४तिकीटविक्रीत २५.६६ कोटींची वाढ
४पास विक्रीत १०.१८ कोटींची घट
४लक्झरी सेवा उत्पन्न ८ लाखांनी वाढले
४मार्गांवरील बसमध्ये वाढ
४प्रवासी १० हजारांनी वाढले