MPSC exam: उत्तरतालिकेत झालेल्या अक्षम्य चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 09:34 PM2021-12-17T21:34:01+5:302021-12-17T21:34:45+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्यासाठी ही उत्तर तालिका तातडीने दुरुस्त करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा २०२० अराजपत्रित गट-‘ब’च्या उत्तरतालिकेत चुकीची उत्तरे देण्यात आली आहेत, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससीने घेतलेल्या पूर्व परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली होती. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ‘ब’ अराजपत्रित संयुक्त पूर्व स्पर्धा परीक्षा ४ सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर उत्तरतालिका प्रसिद्ध केली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. मात्र, त्याचा विचार न होताच अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांच्या भवितव्यासाठी ही उत्तर तालिका तातडीने दुरुस्त करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी युवासेना सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
यादव म्हणाले, आयोगानं ४ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिका कोड ‘अ’ मधील प्रश्न क्रमांक २७ बद्दल विद्यार्थ्यांना आक्षेप आहे. आयोगानं विचारलेल्या प्रश्नात चूक असल्याने विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असल्यानं त्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, यासंदर्भात आयोगाने अंतिम उत्तर तालिकेत कोणताही बदल केला नाही. आयोगानं २७ व्या प्रश्नात ४ विधाने दिली होती. त्यापैकी गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे, असे विधान त्यामध्ये होते. विद्यार्थ्यांचा यावर आक्षेप आहे. गौताळा राष्ट्रीय अभयारण्य असून ते उद्यान नसल्याचे विद्यार्थ्यांनी आयोगाला कळवले होतं. मात्र, त्याचा विचार केलेला नाही. हे विधान प्रश्न विचारलेले विधान योग्य ग्राह्य धरल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे.
एक-एक मार्क विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असताना आयोगचं चुकीची उत्तर प्रसिद्ध करून हजारो तरुणांचे भवितव्य अंधारात ढकलत आहे. सदर प्रकरण सध्या मा. न्यायालयात आहे. न्यालयीन प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत पुढील सर्व परीक्षे संदर्भातील प्रक्रिया थांबविण्यात याव्यात, अशी विनंती युवासेनेने आयोगाला केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आयोगाने याबाबत सर्व माहिती विद्यार्थ्यांना द्यावी व उत्तरतालिकेत झालेली चूका दुरुस्त करण्यात याव्यात. आयोग एक सक्षम आणि विश्वासहार्य घटक असून त्यांनी विद्यार्थी हितासाठी उचित कार्यवाही तातडीने करावी, अशी देखील विनंती केली असल्याचे यादव यांनी सांगितले.