अकरावी ‘रेस्ट इयर’ समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:29+5:302021-07-04T04:08:29+5:30
इयत्ता बारावीचा निकाल कसा जाहीर केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सीबीएसईने स्वीकारलेले सूत्रच ...
इयत्ता बारावीचा निकाल कसा जाहीर केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, सीबीएसईने स्वीकारलेले सूत्रच राज्य मंडळाने स्वीकारले आहे. त्यामुळे दहावी, अकरावीचे गुण आणि बारावीचे अंतर्गत परीक्षांचे गुण विचारात घेऊन बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. पुणे विभागातून बारावीच्या कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या तब्बल २ लाख ३० हजार ९८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १ लाख २६ हजार ६०६ मुलांची तर १ लाख ४ हजार ३३७ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षांचे गुण कसे देणार असा प्रश्न उपस्थित होतो.
--------------
केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर प्रत्येक राज्यातील विद्यार्थी इयत्ता अकरावीला रेस्ट इयर समजतात. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फटका बसेल असे नाही. सीबीएसईने स्वीकारलेले सूत्र राज्य शासनाने स्वीकारले आहे. हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे.
- डॉ. वसंत काळपांडे , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
----------------
दहावी- बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी या परीक्षांकडे अधिक लक्ष देतात. मात्र, अकरावीकडे अनेक विद्यार्थी रेस्ट इयर म्हणूनच पाहतात. परिणामी मध्यम वर्गीय विद्यार्थ्यांना अकरावीत कमी गुण मिळण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे मागील वर्षी अकरावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे सध्याच्या सूत्रामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य
-------------------
विद्यार्थ्यांनी दहावीत चांगले गुण मिळवले. मात्र, कोरोनामुळे अकरावीत प्रत्यक्ष वर्गात जाता आले नाही. त्यामुळे बारावीचा निकाल अनपेक्षित आहे. बोर्डाने जाहीर केलेला निकाल स्वीकारावा लागणार आहे. परंतु, तो कसा असेल याबाबत चिंता आहे.
- तन्वी पवार, विद्यार्थी
-------------
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र या विषयांसाठी ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. तर उर्वरित विषयासाठी २० गुणांची तोंडी किंवा अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आहे. कोरोनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा झाल्याच नाहीत. बोर्डाचे मुल्यमापन ८०/२० पॅटर्ननुसार केले जाते. मात्र, कोणतेचे मुल्यमापन योग्य पध्दतीने झाले नाही.
-----------------------------------
पुणे विभागात बारावीच्या परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थ्यांची आकडेवारी
एकूण विद्यार्थी : २ लाख ३० हजार ९८३
मुलांची संख्या : १ लाख २६ हजार ६०६
मुलींची संख्या: १ लाख ४ हजार ३३७